बुलढाणा (वृत्तसंस्था) आपल्या भावावर जीव ओवाळून टाकत त्याला आपले यकृत देऊन बहिणीने मृत्यूच्या दाढेतून भावाला परत आणले. मात्र, यकृत प्रत्यारोपणानंतर १५ दिवसांपासून मुंबईत उपचार घेत असलेल्या बहिणीने गुरुवारी प्राण सोडले. हृदय हेलावून टाकणारी ही घटना आहे बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील दुर्गा अरुण धायतडक याचं माहेर देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा आहे. तर त्यांचा भाऊ रमेश नागरे हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांची प्रकृती काही दिवसांपासून अधूनमधून खराब होत होती. त्यामुळे लहान भाऊ संतोष नागरे व कुटुंबीयांनी त्यांना मोठमोठ्या दवाखान्यात उपचारासाठी नेले. त्यात यकृताचा आजार असल्याचे निदान झाले. यकृतात बिघाड जास्तच असल्याचे आढळल्याने औषधोपचाराने आजार नियंत्रण साध्य होणार नाही. मात्र, यकृत अवरोपण केल्यास पूर्णपणे आराम मिळेल, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
यामुळे आता कुटुंब, नातेवाईक, मित्र, हितचिंतक सगळेच यकृत कोण देईल ?, या बाबीने चिंताग्रस्त झाले. ही बाब रमेश नागरे यांची बहीण दुर्गा अरुण घायतडक यांच्या कानावर पडल्याने बहीणदेखील चिंताग्रस्त झाली. भाऊ जर जिवंत असला तरच मी भावासोबत दिवाळी भाऊबीज व रक्षाबंधन साजरे करण्यासाठी भावाच्या घरी जाऊ शकेल. त्यामुळे भावाला आपणच यकृत दिले तर मात्र भाऊ वाचू शकतो, असा विचार तिच्या मनात पक्का झाला. तिने आपल्या मनातील ही कल्पना पतीला सांगितली. अरुण घायतडक यांनी क्षणाचाही विचार न करता, लगेच होकार दिला.
घायतडक कुटुंबीयांनी लगेच मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल गाठले. तेथे सर्व तपासण्या झाल्या. त्यात भावाच्या प्रकृतीशी यकृत मॅच झाले. विनाविलंब तज्ज्ञ डॉक्टरांनी ऑपरेशन करून दुर्गाचे यकृत भाऊ रमेश यांना प्रत्यारोपित केले. मात्र, पुढील उपचार घ्यावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर अनेक तपासण्या बाकी असल्याने व वैद्यकीय काळजी म्हणून दुर्गा यांना डॉक्टरांनी मुंबईत राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दुर्गा या मुंबईतच होत्या. गुरुवारी पहाटे त्यांना रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले; मात्र सकाळी त्यांची तब्येत खालावली. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, हे सारे उपचार व्यर्थ ठरले. दुर्गा यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.