नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांच्या जीवनाचा प्रश्न असताना नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा भाग असलेल्या पंतप्रधान निवासस्थानाचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल. कोरोना महामारीच्या काळातच या प्रोजेक्टला पर्यावरण संबंधातील सर्व प्रकारची मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा समावेश आवश्यक सेवांमध्ये केला आहे. लॉकडाऊन सारख्या निर्बंधांच्या काळातही हे काम थांबू नये, असा या मागचा उद्देश आहे. केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता या कामाला आणखी वेग येईल. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांच्या जीवनाचा प्रश्न असताना नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको”, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारला मारला आहे.
गेल्या आठड्यात काँग्रेसने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा अत्यावश्यक सेवेत समावेश केल्याच्या बातमीची लिंक शेअर करत, “ही वास्तू म्हणजे तुमच्या निर्दयतेची साक्ष देणारी वास्तू असेल हे लक्षात ठेवा,” असं मोदींना म्हटलं होतं.
कसा आहे प्रकल्प?
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या प्रकल्पाच्या भूमिपूजनासंदर्भात बोलताना डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सविस्तर माहिती दिली होती. “नव्या संसद भवनाची क्षमता ही जुन्या भवनापेक्षा अधिक असून नव्या भवनात एकाच वेळी लोकसभा सदस्यांसाठी सुमारे ८८८ जागा उपलब्ध असतील तर राज्यसभा सदस्यांसाठी ३२६ पेक्षा अधिक जागा उपलब्ध असतील. म्हणजेच नव्या संसद भवनात एकूण १,२२४ सदस्य एकाचवेळी बसू शकतील. ७५ व्या स्वातंत्र्यदिनी आपण या नव्या संसद भवनातून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु करणार आहोत,” असं बिर्ला म्हणाले होते.