मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज लागला. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश दिला आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरु होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना अभिनंदन देत म्हंटल आहे.