जळगाव (सुरेश उज्जैनवाल) शहरातील प्रतिथ यश आणि समर्पित सेवाभाव जोपासून वैद्यकीय क्षेत्रात चार दशकाहून ही जास्त काळ कार्यरत डॉ.अर्जुंनदादा भंगाळे यांचा आज वाढ दिवस…त्या निमित्त त्याचं अभिष्टचिंतन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा….!
डॉ. अर्जुन दादा अर्थात डॉ. ए.जी. भंगाळे एक सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून जळगावातच गेल्या ४५ वर्षांपासून अखंडितपणे वैद्यकीय सेवा देत आहेत. काळ खूप बदलला असला आणि पैशाला अनन्यसाधारण महत्व आले असले तरी डॉ.भंगाळे यांच्यात कोणताही बदल झालेला दिसून येत नाही. सचोटी, सर्वाशी आपल्यापणाचा नव्हे आपुलकीचा भाव कायमच आहे..त्याच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून त्यांनी देवदूत म्हणून बजावलेली भूमिका वजा कामगिरीच त्यांच्या विलक्षण कुषाग्रतेची प्रचीती आणून देणारा प्रसंग या लेखा द्वारे देत आहे.
मी मूळचा वरणगाव येथील असून आमच्या शेजारी काहुरखेड है एक छोट खेड…श्री.रामभाऊ नारखेडे है एक शेतकरी आणि आमच्या भागातील सहकार क्षेत्रातील एक प्रामाणिक कार्यकर्ते…त्यांच्या शेतात विहीर खोदण्याच काम सुरू होते, ही घटना सन १९८० मधील आहे. विहीर खोदताना काळा पाषाण लागल्यामुळे त्यांनी ब्लास्ट द्वारे काम सुरू केले. त्या वेळी त्यांचा मुलगा रविकांत (वय १६) तेथे ब्लास्ट करणाऱ्यांना मदत करत होता. दुर्दैवाने ब्लास्टिंग वेळी उडालेला दगड रविकांतच्या डोक्यावर आदळला, त्यात तो गांभीर जखमी होऊन त्याची कवटी फुटून मेंदू बाहेर आला. या घटनेने हादरलेल्या रामभाऊ यांनी आमचे बालपणीचे मित्र भरत आत्माराम चौधरी यांना तातडीने घटनास्थळी येण्याचं निरोप दिला.
भरत चौधरी देखील आपली मॅटादोर है वाहन घेऊन घटनास्थळी आले. परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेवून ते पेशंटला घेवून जळगाव गाठत सरळ डॉ.भंगाळे दादांच्या दवाखान्यात पोहचले. डॉक्टरांनी तातडीने रुग्णाला दाखल करून घेत आपले वैद्यकीय कौशल्य पणाला लावत आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी करून पेशंटला वाचविले. खरं तर त्या काळात आज सारख्या आधुनिक वैद्यकीय सुविधा नव्हत्या, आज सारखी यंत्र सामुग्री ही नव्हती आणि त्या पेक्षा विशेष डॉ.भंगाळे दादा ही नवीनच सर्जन होते. जबरदस्त आत्मविश्वास , बौद्धिक कौशल्य आणि जिद्द याच्या जोरावर त्यांनी अवघड आणि अतिशय आव्हानात्मक प्रसंगावर मात करून रुग्ण रविकांत याला देवदूत बनून जीवदान दिले. रुग्ण रविकांत सुमारे एक महिना त्यांच्या दवाखान्यात उपचार घेवून सुखरूप आपल्या काहुरखेडे या गावी गेला. रविकांत आता एक प्रगतिशील शेतकरी असून त्याला दोन मुलं असून डोक्याच्या अवघड शस्त्रक्रिये नंतर त्याला अद्याप पावेतो कुठलाही त्रास झालेला नाही.
डॉ.भंगाळे दादांनी आपल्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक रुग्णांवर उपचार केले त्यांना बरे ही केले ,मात्र काहुरखेड्या च्या सामान्य शेतकऱ्यास दिलेले जीवदान हे वैद्यकीय क्षेत्रातील असामान्य उदाहरण ठरावे….!
– सुरेश उज्जैनवाल (ज्येष्ठ पत्रकार, जळगाव)
मो. 8888889014














