जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असून देखील खाजगी व्यवसाय करणारे डॉ. अजय सोनावणे यांच्याविरुद्ध कायदेशीर करण्यात यावी, या आशयाची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते नरेंद्र भागवत सपकाळे यांनी विविध ठिकाणी केली आहे.
आपल्या तक्रारीत नरेंद्र सपकाळे यांनी म्हटले आहे की, डॉ. अजय बाजीराव सोनावणे (अस्थीरोग तज्ञ) हे जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दि. 12 एप्रिल 2016 पासून वैद्यकीय अधिकारी वर्ग- 2 या पदावर कार्यरत असून, जिल्हा सामान्य रुग्णालय याठिकाणी नियुक्ती करून घेतली आहे. या नियुक्ती पूर्वीच डॉ. अजय सोनावणे, हे आपले खाजगी ओम साई अक्सिडेंट हॉस्पिटल या नावाने चालवीत आहेत.
डॉ. अजय सोनावणे हे एक अस्थीरोग तज्ञ असून जळगाव जिल्हयातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कार्यरत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सेवा बजावत आहे. परंतु ते मागील ६ वर्षापासून ते एकाच ठिकाणी कार्यरत आहे. अद्याप पर्यंत नियमा नुसार त्यांची कुठेही बदली करण्यात आली नाही. त्यांना आपल्या खाजगी हॉस्पिटल व इतर हॉस्पिटल मध्ये ON Call जाण्याची मुभा त्यांना मिळावी असा त्यांचा उद्देश असल्याचा आरोप श्री. सपकाळे यांनी केला आहे.
डॉ. अजय बाजीराव सोनावणे हे आपल्या पदास्थाप्नेवर पूर्णवेळ सेवा देताना कधीच आढळून आले नाहीत. या उलट ते on call इतर खासगी हॉस्पिटलला देत असतात. या सर्व हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारणा केली असता ते या सर्व हॉस्पिटलमध्ये येऊन सेवा देतात अशी माहिती मिळाली. एवढेच नव्हे तर ते बऱ्याच वर्षापासून ते खाजगी हॉस्पिटल मध्ये सेवा देत आहेत.
शासन निर्णय काय म्हणतो ?
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी दि. 07 ऑगस्ट 2012 रोजी पारित केलेल्या शासन निर्णय क्रं मवैअ/२०११/प्र.क्र.६२६/११/सेवा-3 मंत्रालय मुंबई नुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारे खाजगी, स्वातंत्र्य व्यवसाय करता येणार नाही. तसे आढळल्यास ते नियमानुसार कार्यवाहीस पात्र राहतील असे अनुक्रम 4 मधे स्पष्ट दिलेले आहे. व्यवसायरोध भत्ता घेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वतःच्या नावे रुग्णालय अथवा दवाखाना चालविता येणार नाही. याबाबत अनुक्रम 4:5 मधे स्पष्ट दिलेले आहे. तसेच अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी रुग्णालयात किंवा दवाखाण्यात जाऊन आरोग्यसेवा देता येणार नाही, असेही आदेश म्हटले आहे, असेही श्री. सपकाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
डॉ. अजय सोनावणे यांनी दि 07 ऑगस्ट 2012 रोजीच्या शासन निर्णय व त्यातील अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक असताना त्यांनी त्यातील सर्व अटी व शर्तीचे उल्लंघन केलेले आहे. ते शासकीय सेवा बजावत असतांना ओम साई अक्सिडेंट हॉस्पिटल (नंदादीप 63ब ख्वाजामिया रोड रिंग रोड, गोकुळ restaurant समोर) या ठिकाणी मुंबई नर्सिग होम रजिस्टर अधिनियम अंतर्गत नोंदणी करून खाजगी व्यवसाय करीत असल्याबाबत निदर्शनास आलेले आहे. तसा फलक रुग्णालयाच्या दर्शनीभागात नामनिर्देशित पदवीसह आढळून आलेला आहे. तसेच नोंदणी केल्याचे महानगरपालिका जळगाव यांच्याकडे नोंदणी असल्याबाबत माहिती अधिकारात प्राप्त माहितीवरून कळते, असेही तक्रारीत नमूद आहे.
अशाप्रकारे डॉ. अजय सोनावणे यांनी शासन सेवा बजावत असतांना खाजगी व्यवसाय करून शासनाची फसवणूक केलेली आहे. त्यानुषंगाने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई व्हावी. त्यांनी घेतलेले वेतन व भत्ता वसूल करावा. तसेच त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सपकाळे यांनी केली आहे.
ज्या प्रकारे शासकीय सेवा बजावत असतांना खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणे कायद्याने चुकीचे आहे. त्याचप्रकारे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या रुग्णालय व हॉस्पिटल तसेच संस्थांनी संबंधित शाकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात व्यवसायासाठी येऊ देणे व त्यांच्याकडून सेवा घेणे हे सुद्धा चुकीचेच आहे, तेही कायद्याने चुकीचे असल्याचेही श्री. सपकाळे यांनी तक्रारीत म्हटले म्हटले आहे. ही तक्रार आरोग्य विभागाचे आयुक्त, अपर मुख्य सचिव,संचालक आरोग्य विभाग यांच्यासह जिल्हाचिकित्सक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.