बोदवड (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांच्या सहकारी पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये बोदवड तालुका सर्वसाधारण मतदारसंघातून शेलवड येथील बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक ज्ञानेश्वर तुकाराम मोझे हे विजयी झाले. त्यांनी एकूण ६४ मते मिळवून निवडणूक जिंकली.
जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळची पंचवार्षिक निवडणूक रविवार दि.२१ रोजी संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये पतपेढीच्या सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून पतपेढीच्या उत्कर्षसाठी तालुक्यातील समविचारी शाळाच्या सहकार्याने ज्ञानेश्वर मोझे यांनी सर्वसाधारण मतदार संघातून उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या उमेदवारीला ग्रामीण भागातील तथा शहरातील काही शाळांनी बिनशर्त पाठिंबा दिला.आणि या बळावर मोझे यांनी ही निवडणूक जिंकली. प्रतिस्पर्धी असलेले बोदवड रांका हायस्कूलचे शिक्षक दिनेश अंजाळे यांना ५० मते तर याच हायस्कूलचे दुसरे उमेदवार दीपक चौधरी यांना २३ मते या निवडणुकीत प्राप्त झाली. विजयी झालेले मोझे यांचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बांधवांनी अभिनंदन केले आहे. विजयी झालेले मोझे हे अपक्ष म्हणून रिंगणात होते. सहकार गटाचे उमेदवार यावेळी पराभूत झाले.