मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Nawab Malik) यांची मुलगी निलोफर मलिक-खान यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या वडिलांना खोटं सांगून कार्यालयात नेले. त्यानंतर ईडीकडून त्यांचे दाऊद कनेक्शन दाखवण्यासाठी खोटे पुरावेही सादर करण्यात आले, असा आरोप निलोफर मलिक-खान यांनी केला. त्या गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या.
रिमांड काॅपीत मलिकांना महसूल मंत्री म्हटले – निलोफर मलिक
ईडीच्या रिमांड कॉपीमध्ये नवाब मलिक यांचा उल्लेख महसूल मंत्री असा आहे. कुर्ल्यातील जमिनीचा व्यवहार झाला तेव्हा नवाब मलिक महसूल मंत्री होते, असे रिमांड कॉपीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, नवाब मलिक हे कधीच महसूल मंत्री नव्हते. तरीही केंद्रीय तपास यंत्रणा रिमांड कॉपीत खोटी माहिती नमूद करतात. हा जमिनीचा व्यवहार ५५ लाख रुपयांचा आहे. याप्रकरणात झालेले आरोप पाहता ही मुळात सिव्हिल केस असायला हवी होती. पण याठिकामी मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याकडे निलोफर मलिक यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वडिलांना खोटं सांगून चौकशीसाठी नेले
यावेळी निलोफर मलिक यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वडिलांना खोटं सांगून चौकशीसाठी नेल्याचाही दावा केला. सकाळी सहाच्या सुमारास ईडीचे अधिकारी आमच्या घरी आले. त्यांनी आमच्याकडे सर्च वॉरंट असल्याचे सांगितले. तेव्हा आम्ही त्यांना घराची झडती घेण्यास सांगितले. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांना माझ्या वडिलांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्याने कार्यालयात यावे लागेल, असे सांगितले. त्याला माझ्या वडिलांनी होकार दर्शविला. ते स्वत:च्या गाडीत बसून ईडी कार्यालयात गेले. मात्र, त्याठिकाणी गेल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या हातात चौकशीचे समन्स ठेवले. त्यावर सही करण्यास सांगितले. तेव्हा माझ्या वडिलांनी समन्सवर सही करण्यास नकार दिला. त्यानंतर ईडीने चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले, असा आरोप निलोफर मलिक यांनी केला.
मुसलमान म्हणून स्वतंत्र ओळख नाही का?
यावेळी निलोफर मलिक यांना नवाब मलिक यांच्या डी गँगशी संबंध असल्याविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर निलोफर मलिक यांनी म्हटले की, मुस्लीम व्यक्तीचे नाव दाऊदशी जोडले जाते. पण आम्हाला मुसलमान म्हणून स्वतंत्र ओळख नाही का, असा सवाल निलोफर मलिक यांनी विचारला. तसेच भाजप नेत्यांच्या टीकेकडे आम्ही लक्ष देत नाही. आमच्या कुटुंबातील एकही व्यक्ती घाबरलेली नाही. आम्ही याविरोधात लढा देऊ. लवकरच माझे वडील बाहेर येतील, असे निलोफर मलिक यांनी सांगितले.