धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी मिरवणूक काढून आज ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहाने साजरी केली. भंडागपुरा भागात शहरातील सर्व मुस्लिम बांधव दुपारी दोन वाजेच्या सुमारास जमा झाले होते. त्यानंतर भंडागपुरा भागातून मिरवणुकीला सुरुवात झाली. ईद-ए-मिलाची मिरवणूक धरणी चौक, जैन गल्ली, पिल्लू मशीद भागातून परीहार चौक, बेलदार गल्ली, किरण मंदिर, तेली तलावमार्गे पाताल नगरी या भागात मिरवणूक गेल्यानंतर त्या ठिकाणी मिरवणूक समाप्त झाली.
ईद-ए-मिलादची मिरवणूक पिल्लू मशीन जवळ आल्यानंतर धरणगाव बेघर संघर्ष समितीचे प्रमुख अॅड. व्ही.एस. भोलाणे यांनी ईद-ए-मिलाद मिरवणुकीचे प्रमुख सय्यद साहब यांचा शाल व फुलगुच्छ देऊन सत्कार केला तसेच मिरवणुकीतील सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी सय्यद सर तसेच धरणगाव शहरातील मुस्लिम समाजातील समाज बांधव उपस्थित होते. ईद-ए-मिलाद मिरवणुकीचे प्रमुख सय्यद साहेब यांचा रथ मिरवणुकीत सर्वात पुढे होता.
परिहार चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे मिरवणुकीतील लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच समाजातील प्रमुख लोकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी उबाठा शिवसेनेचे शहर प्रमुख भागवत चौधरी तसेच संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी व शिवसेनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच ईद-ए-मिलादची मिरवणूक तेली तलावाजवळ आल्यानंतर नवे गावाजवळ शिवसेना शिंदे गटातर्फे 65 किलो नानखटाईचे वाटप मिरवणुकीतील सर्व मुस्लिम बांधवांना करण्यात आले.
मिरवणुकीमधील सर्व मुस्लिम बांधवांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विलास महाजन तसेच नगरपालिकेचे गटप्रमुख पप्पूभाऊ भावे, संजय चौधरी, बाळू जाधव, वाल्मीक पाटील, हेमंत गोविंदा महाजन, गोविंदा धनगर, सत्यवान कंखरे, पवन महाजन यांनी यासाठी परिश्रम घेतले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषीकेश रावले यांच्यासह धरणगाव पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव या सर्वांनी पोलीस विभागातर्फे बंदोबस्त ठेवला.