मुंबई (प्रतिनिधी) राज्य सरकारने शिफारस केलेल्या १२ विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय केव्हा घेणार ? अशी विचारणा आज उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या सचिवाकडे केली असून यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने शिफारस केलेल्या या नावांमध्ये एकनाथराव खडसे यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर आली असून या निर्णयाकडे खडसे समर्थकांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमिवर, या १२ सदस्यांच्या नियुक्तीचा वाद हायकोर्टात गेला आहे. आज यावरून उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात राज्यपालांच्या वकिलांना राज्य मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नावांवर निर्णय केव्हा घेणार?, असा सवाल केला. यामुळे आता न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानपरिषदेच्या जागांचा निर्णय घेण्यात येणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, एकनाथराव खडसे यांच्या आमदारकीचा मार्गदेखील यातून मोकळा होण्याची अपेक्षा असल्याने आता त्यांच्या समर्थकांच्या आशा दुणावल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हावासियांना याबाबतची उत्सुकता ही अर्थातच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आमदारकीमुळे आहे. मंत्रीमंडळाने शिफारस केलेल्या या नावांमध्ये खडसे यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत कुणी अधिकृत घोषणा केली नसली तरी नाथाभाऊंनी या माहितीला आधीच दुजोरा दिला आहे.