जळगाव प्रतिनिधी – जळगाव शहरातील जिल्हापेठ भागात पाणी भरण्यासाठी मोटारीचे बटन सुरु करायला गेलेल्या ७० वर्षीय वृद्धाला विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी २१ जुलै रोजी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला रात्री उशीरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
सुधीर गोवर्धन महाजन ( वय ७०, रा. जिल्हापेठ, जळगाव) असे मयत वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ते परिवारासह राहत होते. रविवारी २१ जुलै रोजी संध्याकाळी टाकी भरण्यासाठी त्यांनी मोटार सुरु करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विजेचे बटन दाबत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात ते दूरवर फेकले गेले. प्रसंगी कुटुंबीयांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रुग्णालयात नातेवाईक तसेच कॉलनीतील नागरिकांनी गर्दी केली होती. घरातील वडीलधारी व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.