नागपूर (वृत्तसंस्था) सत्ता प्रत्येकाला हवी असते. सत्तेसाठी संघर्ष करतानाही विवेक वापरायला हवा. निवडणुकांमध्ये वैचारिक लढा हवा, युद्ध नको. सामाजिक अंतर निर्माण करणे हे राजकारण नाही. निवडणूक ही एक स्पर्धा आहे. ही स्पर्धा खेळीमेळीनं व्हावी, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमी उत्सवात अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत संबोधन केले. यावेळी स्वयंसेवक डिजिटली या विजयादशमी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
धर्मनिरपेक्षेतेचं नाव पुढे करुन समाज तोडू नका असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात केलं आहे. हिंदू राष्ट्र हा शब्द संघ जेव्हा वापरतो तेव्हा त्यामुळे सत्तापिपासूपणा नसतो. त्यामध्ये सत्ता मिळवण्याची लालसा नसते तर सर्वसमावेशक अर्थाने हा शब्द संघ वापरत असतो. राजकीय स्वार्थासाठी देश तोडण्याचं काम काही लोक देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेविरोधात करतात. त्यांना ओळखणं खूप आवश्यक आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. एकमेकांच्या स्वार्थासाठी जे नातं जोडतात ते स्वार्थ संपला की बाजूला होतात. संघाचं नातं तसं नाही संघाचं नातं हे समरसतेचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशाच्या वैविध्यतलेला विभाजनाचं नाव दिलं जातं आहे ही बाब चुकीचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
हिंदू शब्दावरुन वाद निर्माण समाजात दुरावा निर्माण करतात. संघाला काही कारण नसताना बदनाम केलं जातं आहे. संघाबाबत कोणत्याही चुकीच्या गोष्टी पसरवण्याच्या आधी संघाची विचारधारा समजून घ्या असंही आवाहन मोहन भागवत यांनी केलं. आपण सगळे भारतमातेचे सुपुत्र आहोत, भारतीयांना आम्ही हिंदू म्हणतो यात गैर काय? आपलं संपूर्ण शरीर एकच आहे त्यामध्ये हात वेगळे आहेत, पाठीचा भाग आणि चेहरा हे ज्याप्रमाणे दिसण्यासाठी समान नसतात पण एकाच शरीराचा भाग असतात अगदी तसेच देशाचे स्वरुप आहे.
सगळे शरीर जसं एकच आहे तसाच आपला देशही एकच आहे मात्र काही लोक त्यातला फरक दाखवण्याचा प्रयत्न करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. फुटिरतावादी लोक हे राष्ट्रीय एकात्मतेविरोधात काम करत आहेत. तुकडे तुकडे गँग असंही त्यांना म्हटलं जातं आहे ही गँग देश तोडण्याचं काम करते आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. करोना काळात स्वदेशी हा शब्द चांगलाच प्रचलित झाला. स्वदेशीमधला स्व हेच आमचं हिंदुत्व आहे. स्वामी विवेकानंदांनीही स्वदेशीचा मंत्र दिला होता आम्हीही तेच म्हणतो आहोत. विनोबा भावेंनी स्वदेशी म्हणजे स्वावलंबन हा अर्थ सांगितला आहे आम्हीही ती गोष्ट मानतोच आहोत असंही मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं.