जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२०२३ अंतर्गत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यास आता २८ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून संबंधित यंत्रमाग घटकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक होते. तथापि, यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन नोंदणी केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे २७ अश्वशक्तीपेक्षा कमी व त्यापेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतवाढीनंतर संबंधित यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज सादर केला नाही, तर त्यांची वीज दर सवलत बंद करण्यात येईल, असेही श्रीमती उगले यांनी म्हटले आहे.