जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील स्वमालकीच्या जमिनीतून बेकायदा गौण खनिजाचा उपसा केल्याप्रकरणी आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांना दिलासा देण्यास औरंगाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला.
दंडात्मक कारवाई विरोधात खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी न्या. घुगे आणि न्या. खोब्रागडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. परंतू खडसे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांना दिलासा देण्यास औरंगाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच याचिका खारिज करण्याची तयारी दाखविली. त्यामुळे याचिका मागे घेतल्याने दंडाच्या आदेशावर खडसेंना प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागणार आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. डी. आर काळे यांनी काम पाहिले.
अशी आहे दंडाची रक्कम !
सातोड शिवारातून आमदार एकनाथराव खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, मुलगी रोहिणी व सून खासदार रक्षाताई खडसे यांनी १ लाख १८ हजार २०२ ब्रास मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन केल्याप्रकरणी मुक्ताईनगर तहसीलदारांनी दि. ६ ऑक्टोबर रोजी नोटिसा बजावल्या होत्या. एकनाथराव खडसे (४८ कोटी ७६ लाख ७५ हजार २८०), मंदाकिनी (२२ कोटी ०१ लाख १५ हजार ६८०), रोहिणी (३० लाख १७ हजार ६४३) व रक्षाताई खडसे (६६ कोटी ०७ लाख ७३ हजार २८०) यांना १३७ कोटींचा दंड भरण्याचे आदेश दिले होते.