नागपूर (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नागपुरात आगमन झाले. विमानतळावर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मात्र फडणवीस या ठिकाणी माध्यमांशी न बोलता धरमपेठ येथील आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाले. त्यांच्या निवासस्थानावरही अनेकजण त्यांना भेटायला आले होते, मात्र त्यांनी भेट घेणे टाळले. मात्र दुपारी जवळपास दोन तास उपमुख्यमंत्री फडणवीस यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन पदाधिकाऱ्यांशी ‘बंदद्वार’ चर्चा झाली. या चर्चेत नेमके काय झाले?, हे जरी स्पष्ट नसले, तरी आगामी निवडणुका लक्षात घेता फडणवीस यांनी वेगळा निर्णय न घेता पदावर कायम राहावे यासंदर्भात संघाद्वारे सल्ला दिला गेला असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीकरिता वरिष्ठांनी आपल्याला उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाकडून फडणवीस यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विमानाने नागपुरात आगमन झाले. विमानतळावर फडणवीस यांना भेटण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सर्वांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला, मात्र माध्यम प्रतिनिधी व इतरांशी न बोलता ते आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाले. येथे त्यांनी त्यांना भेटायला आलेल्यांची भेट घेतली नाही. मात्र संघाच्या तीन पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली.
लोकसभा निकालानंतर संघदेखील ‘अॅक्शन मोड’ मध्ये आला असून, यासंदर्भात ही भेट झाली असल्याचे बोलले जात आहे. फडणवीस यांची भेट घेऊन बाहेर आलेले संघाचे हे पदाधिकारी एका कारमध्ये बसून रेशीमबाग येथील स्मृतिमंदिराकडे रवाना झाले. यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस सायंकाळी ५ वाजता दिल्लीला जाण्याकरिता विमानतळाकडे रवाना झाले. दिल्लीत संसदीय मंडळाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष व नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याच बैठकीकरिता फडणवीस दिल्लीला रवाना झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी निवासस्थानी पोहोचल्यावर मंत्रिमंडळाच्या ऑनलाइन बैठकीत सहभाग घेतला. फडणवीस व गडकरी हे राष्ट्रीय पातळीवरील नेते असल्याने नागपुरात आलेले संघाचे पदाधिकारी त्यांची भेट घेत असतात. त्यामुळे संघाच्या पदाधिकाऱ्यांशी गुरुवारी झालेली भेट ही एक सामान्य भेट होती, असा दावा भाजपाच्या एका प्रदेश पदाधिकाऱ्याने ‘पुण्य नगरी’शी बोलताना केला