जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) तसेच बँकेचे उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे आता नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष (Jdcc) गुलाबराव देवकर यांनी सोमवारी देऊ घातलेला अध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी रोखला होता. दिवसभराच्या गाठीभेटी, बैठका आणि रात्री उशिरापर्यंत समर्थकांशी चर्चा केल्यानंतर अध्यक्ष देवकर यांनी अखेर आज मंगळवारी राजीनामा दिला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षपदी नवीन संचालकाला संधी देण्यासाठी ३ फेब्रुवारी रोजी जिल्हा बँकेत संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अध्यक्ष देवकर यांनी सोमवारी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, गेल्या पंचवार्षिकमध्ये अॅड. रोहिणी खडसे तब्बल सहा वर्षे बँकेच्या अध्यक्षा होत्या. दुसरीकडे अवघ्या वर्षभरात देवकरांकडे राजीनामा मागण्यात आल्याचे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. कार्यकर्त्यांशी बोलूनच निर्णय घ्या अशी आग्रही भूमिका मांडणाऱ्या समर्थकांमुळे गुलाबराव देवकर यांनी राजीनामा दोन दिवस लांबणीवर टाकला होता. मात्र, आज अखेर बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर तसेच उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.