पुणे (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. नाशिक दौऱ्यानंतर राज सध्या पुण्यात असून त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ही भेट एका खास कारणामुळे चर्चेत आलीये ती म्हणजे मास्क घातलेले राज ठाकरे पाहायला मिळाले. त्यामुळे दोघांच्या भेटीसोबतच राज ठाकरेंनी घातलेल्या मास्कचीही सर्वत्र चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुण्यातील पर्वती परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या निवासस्थानी मंगळवारी राज ठाकरेंनी ही भेट घेतली. बाबासाहेब पुरंदरे पुढच्याच आठवड्यात वयाची ९९ वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचं वयोमान आणि संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेत राज ठाकरेंनी मास्क लावत काळजी घेतल्याचं दिसतंय.
‘मी मास्क घालतच नाही’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हता. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं होतं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ‘त्यांना माझा नमस्कार सांगा,’ असे उत्तर दिले होते.