मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासाठी ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणे यांचा फोन अखेर लागला आहे. राज ठाकरे यांनी फोनवरून नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या.
गेल्या आठवड्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचे खासदार नारायण राणे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली. मोदींनी नारायण राणेंकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवली आहे. मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर नारायण राणेंना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही राणेंना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. पण त्यांचा फोन बंद होता, असं राज ठाकरेंनी सांगितलं. काल पुण्यात बोलताना त्यांनी सांगितलं. मात्र आज नारायण राणे यांचा फोन लागला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले खासदार नारायण राणे यांचं राज ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. तसंच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोमवारी सकाळी या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाली.
काय म्हणाले होते राज ठाकरे
राज ठाकरे काल पुणे दौऱ्यावर होते. याचरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर मी नारायण राणे आणि त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर फोन केला होता. मात्र त्यावेळी दोघांचाही फोन बंद होता. त्यामुळे संपर्क झाला नाही. मात्र येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा संपर्क करुन नारायण राणे यांना शुभेच्छा देईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होत. त्यानंतर आज लगेचच राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. मात्र, याशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही राजकीय स्वरुपाची चर्चा झाली का, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
मुख्यमंत्र्यांचं मन एवढं मोठं नाही – नारायण राणे
तत्पूर्वी, नारायण राणेंना मंत्रिपद जाहीर केल्यापासून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच, ‘शरद पवार यांनी मला फोन केला, चांगलं काम करा, असे ते म्हणाले. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप मला शुभेच्छा दिलेल्या नाहीत. कारण त्यांचं मन एवढं मोठं नाही. मला मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेले नाही. मात्र, महाराष्ट्रातील सर्व विभागातून मला शुभेच्छा मिळाल्या, त्याच मी त्यांच्या वतीने शुभेच्छा समजतो, असेही नारायण राणेंनी म्हटले.
















