जळगाव (प्रतिनिधी) खोटे दस्तावेज बनवत भुसावळ तालुक्यातील दर्यापूर येथील जयश्रीराम ग्रामीण बिगर शेतीसह पतसंस्थेस आर्थिक नुकसान पोहोचविल्याप्रकरणी भाजपाचे ओबीसी सेलचे माजी प्रदेश सरचिटणीस अजय एकनाथ भोळे व जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांचे मोठे बंधू प्रमोद नाना पाटील यांच्यासह तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश बाजार पेठ पोलिसांना दिले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील जयश्रीराम ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचा विस्तारीत कक्ष भुसावळ येथे आहे. सदरील पतसंस्थेचे कार्यालय १२ डिसेंबर २००५ पासून नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्समधील गाळा नं. जी ५ व जी ६ मध्ये कार्यरत आहे. सदर गाळ्याचे कायदेशीर मालक अजय एकनाथ भोळे यांनी १२ डिसेंबर २००५ पासून मासिक भाड्याने पतसंस्थेला कराराद्वारे हे गाळे दिलेले होते. त्यानंतर काही कालावधी गेल्यावर अजय भोळे यांना घरगुती कारणाच्या अडचणी आल्याने सदर गाळ्याची विक्रीस काढावे लागले. दरम्यान, पतसंस्थेचे चेअरमन या नात्याने दिपक भास्करराव राणे यांनी संस्थेच्या हिताचा विचार करीत ठरल्या बाजाराभावाप्रमाणे प्रत्येक ११ लाख ५० हजार किंमत ठरवित. गाळा खरेदीचा करारनामा केला. ठरल्याप्रमाणे चेअरमन दिपक राणे यांच्यामार्फत अजय भोळे यांनी १९ फेब्रुवारी २००७ रोजी १५ लाख ५० हजार रूपये रोख स्वरुपात घेतले. तसेच खरेदी संदर्भामध्ये अजय भोळे यांनी सौदेपावती मध्ये पतसंस्थेत लेखी करार लिहून देत म्हटले की, पतसंस्थेत संबंधीत गाळे खरेदीसाठी मी बाधिल राहील. दरम्यानच्या काळात नगरपालिका प्रशासनाच्या दप्तरी कराच्या रजिस्टरमध्ये सदर गाळ्याचे नोंदणी पतसंस्थेच्या नावे अर्थात चेअरमन दीपक राणे असे नाव रजिस्ट्ररमध्ये दाखल झाले होते. यामुळे नगरपालिकेस गाळ्याचे कराच्या वसुली पोटी पतसंस्थेकडून कराची अदागी होत होती.
फिर्यादी संस्थेमार्फत दोन्ही गाळे खरेदी बाबत नोंदणीसाठी भोळे यांना वारंवार सुचना करूनही त्यांनी खरेदी करून दिली नाही. यानंतर संस्थेने याबाबत न्यायालयात धाव घेतली होती. प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना संबंधीतांनी गाळ्यांचा ताबा पतसंस्थेकडे असतांना अजय भोळे यांनी निखील सुभाष शिंदे व प्रविणसिंग राजकुमारसिंग ठाकूर दोघे रा. भुसावळ यांना सदर मिळकत ताबा कब्जा नसतांनाही भुसावळ दुय्यम निंबधक कार्यालयातील दस्तक क्रं. ३६१४/२००९ व दस्तक क्रं. ३६१३/२००९ प्रमाणे मोजमाप करून ताब्यात दिल्याचा खोटा उल्लेख करीत खरेदी दिल्याचे नमुद केले आहे. त्याचप्रमाणे निखील सुभाष शिंदे व प्रविणसिंग राजकुमारसिंग ठाकूर यांनी १४ डिसेंबर २०१८ रोजी रजिस्ट्रर खरेदी खताने दस्त क्रं.५३३६/२०१८ व दस्त क्रं. ५३३५/२०१८ प्रमाणे ताबा दिल्याचा बनावट उल्लेख केला आहे. सदर खरेदी खताप्रमाणे बनावट दस्तावेज तयार करून पतसंस्थेचा ताबा असतांनाही दोन्ही वेळा शासनाला फसवित बनावट दस्तावेजातून विनोद नामदेव सोनवणे रा. खामखेडा ता. मुक्ताईनगर यांच्या नावे गाळे करण्यात आले आहेत.
दरम्यान, या बनावट दस्तावेज करीत असतांना भुसावळ नगरपरिषदेतील फिर्यादी पतसंस्था चेअरमन यांचे नाव १०० रुपयांचा बनावट स्टॅम्पपेपर बनवित प्रमोद नाना पाटील यांनी फिर्यादी संस्थेचे चेअरमन दीपक भास्कर राणे यांची बनावट स्वाक्षरी करीत भुसावळ येथे कार्यकारी दंडाधिकारी (तहसिल कार्यालयात ) यांची दिशाभूल करीत बनावट स्वाक्षरीचे प्रतिज्ञापत्र तयार केले. या बनावट स्वाक्षरीच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे गाळ्याचा व्यवहार परस्पर करीत ताबा नसतांनाही बनावट पध्दतीने दिल्याचा आरोप पतसंस्थेच्यावतीने करण्यात आला आहे. याबाबत सर्व कागदपत्र माहिती अधिकारात १० ऑगस्ट २०२० रोजी घेतली असता हा सर्व बनावट प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधीतांविरोधात पतसंस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पीटीशन नं. १८५४/२०२० नुसार सीआरपीसी कलम १५४ प्रमाणे भादंवि १२० ब, ४२०, ४६७, ४६८(३४ प्रमाणे) दाद मागितली होती. त्यावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अजय एकनाथ भोळे, निखील सुभाष शिंदे, प्रविणसिंग राजकुमारसिंग ठाकूर, प्रमोद नाना पाटील, विनोद नामदेव सोनवणे यांच्या विरुध्द चौकशी करीत अहवाल सादर करण्याचा आदेश संबंधीत पोलिस स्थानकाकडे दिला आहे. सदर प्रकरणी संस्थेचे कायदा विशेष सल्लागार अॅड. कैलाश लोखंडे, अॅड. प्रकाश फेगडे व औरगाबाद खंडपीठाचे अॅड. शेख नासिर यांनी कामकाज पाहीले.