माळवा (वृत्तसंस्था) शिवसेनेचे (shivsena) माजी खासदार आणि काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले गजानन बाबर (gajanan babar) यांचं निधन झालं आहे. ते ८० वर्षांचे होते. बाबर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पिंपरी चिचंवडमधील ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली.
गजानन बाबर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रथम त्यांना निरामय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती जास्तच खालावल्याने काल त्यांना बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आलं. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मावळमधे शिवसेना पक्षाविस्ताराच्या दृष्टीने गजानन बाबर यांचं प्रचंड मोठं योगदान होतं. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची पहिली शाखादेखील बाबर यांनीच सुरू केली होती. मात्र काही वर्षांपूर्वी बाबर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबर यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.