बोदवड (प्रतिनिधी) महसूल राज्यमंत्री महाराष्ट्र यांच्याकडे न्यायप्रविष्ट असलेल्या व्यापारी संकुल प्रकरणातील जागेच्या समोर कोंडवाड्याचे येण्या-जाण्याच्या मार्गावर अनधिकृत विनापरवाना जिन्याचे बांधकाम सुरु असल्याची तक्रार होऊन सुद्धा कारवाई न झाल्याने माजी ग्रा.पं. सदस्या प्रमिला वराडे यांनी बोदवड नगरपंचायत मुख्याधिकारी आकाश डोईफोडे यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार करत निषेध व्यक्त केला. या प्रसंगामुळे गोंधळलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी या निषेधाचे पुष्पगुच्छ देतांना छायाचित्र घेण्यास मज्जाव केला. परंतु या अनोख्या गांधीगिरी आंदोलनाची चांगलीच चर्चा आता सुरु झाली आहे.
या विषयासंबधी माजी ग्रा.पं. सहस्या प्रमिला वराडे यांनी दि. ३ ऑक्टोंबर रोजी मुख्याधिकारी यांच्याकडे बोदवड शहरातील सि. स.न. २७४० नगरपंचायत घर नं. २६४३ बाबत एक तक्रार अर्ज दिला होता. त्यात असे नमूद केले आहे कि, संबधीत जागेविषयी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. संबंधित विषय राज्य मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई येथे २०२१ पासून न्यायप्रविष्ठ आहे. मात्र, आज रोजी वरील अनधिकृत व्यापारी संकुलासमोर व नगरपंचायतीच्या मालकीचा कोंडवाडा आहे. तिथे जाण्या येण्याच्या मार्गात विना परवानगी जिन्याचे बांधकाम सुरू आहे. तशी माहीती तक्रारदार यांनी तोंडी स्वरुपात पालिकेला दिलेली आहे. यानंतर 3 दिवसात बांधकाम काढण्यासंबंधी नोटीस दिली असल्याचे सांगितले होते. आज रोजी आठवडा होऊनही कार्यवाही नाही, असेही तक्रारदार वराडे यांनी म्हटले आहे.
तसेच या पत्रात वराडे यांनी असेही नमूद केले आहे की, संबंधित जागेतील व्यापाऱ्यांना ३ मे २०१७ रोजी नोटीस देऊन खुलासा मागविला होता. मात्र पाच वर्षे होउनही अद्याप पावेतो खुलासे का घेतले नाही?, याचा खुलासा सुद्धा मागितला आहे. त्याच बरोबर सदर व्यक्तीने प्रशासनाकडे वेळोवेळी जोडलेली बांधकाम परवानगी विषयी तक्रार केली असून सदर प्रकरणी तत्कालीन सरपंच/ ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे सुद्धा तत्कालीन मुख्याधिकारी यांनी खुलासे मागविले होते. हे खुलासे नगरपंचायतीकडे का उपलब्ध झाले नाही?, याचा लेखी खुलासा मिळावा. सदर बांधकाम परवानगीवर घर बांधकाम असे लिहलेले दिसून येते. मग सदर परवानगी व्यापारी संकुला कामी वापरली जाऊ शकते का ? याचा खुलासा मिळावा. सदर व्यक्तीच्या दि. १ फेब्रुवारी २०१७ रोजीचे अर्जाचे अवलोकन केले असता सदर बांधकाम या तारखेपूर्वीच केलेले आहे, असे नगरपंचायतीकडे म्हणणे दिले आहे. त्यावर नगरपंचायत प्रशासनाने मालमत्ता कर वसूली कामी नोटीसांची तसेच आजपावेतो संबधितांकडून वसूल केलेल्या कराच्या पावत्यां मिळाव्यात असेही अर्जात नमूद करून सुद्धा कोणताही प्रतिसाद नगरपंचायती कडून न मिळाल्याने १० आक्टोंबर दुपारी मुख्याधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत निषेध व्यक्त केला, असे क्लिअर न्यूज शी बोलताना श्री. वराडे यांनी सांगितले. या बाबत मुख्याधिकारी डोईफोडे यांनी सांगितले की, आलेल्या तक्रारीनंतर संबंधित बांधकामधारकास नोटीस देऊन कागदपतत्रांसह खुलासा मागितला असून तो मिळाल्या नंतर त्याच्या अवलोकन करून नियमानुसार कारवाई नगरपंचायततर्फे केली जाईल.