जळगाव (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर असल्याने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) गेली सहा वर्षे अडचणीत होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. मात्र आता खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने त्यांच्या पराभवासाठी गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भोसरी जमीन प्रकरणाचा आरोप झाल्यानंतर खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ खडसे यांना गेली सहा वर्षे राजकीय संघर्ष करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या यादीत त्यांचा समावेश केला. मात्र भाजपच्या खेळीने ती यादी अद्याप प्रलंबीत राहिली. भाजपने खडसे यांच्या मार्गात राजकीय काटे पेरले. त्यामुळे खडसे यांचा विजय झाल्यास सर्वाधिक धक्का भाजप व गिरीश महाजन यांना बसणार आहे.
खानदेशचे राजकारण बदलणार?
आज होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणूकीत खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या राजकीय उत्कर्षाची पुन्हा आशा निर्माण झाली आहे. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तब्बल सहा वर्षांनंतर ते गुलाल उधळणार काय याचा उत्सुकता आज शमेल. या निकालाने खानदेशचे राजकारण बदलणार आहे.