जामनेर (प्रतिनिधी) मंत्री गिरीश महाजन मला पित्यासमान मानतात, तर मी त्यांना मालमत्तेत वाटा न देण्याच्या अटीवर मुला-समान मानतो, माझे आशिर्वाद आहेत, तोपर्यंत आमदार गिरीश महाजन यांचा पराभव अशक्य असल्याचे वक्तव्य माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी केले. जामनेर तालुका वगळता आपण राष्ट्रवादीचे असल्याचाही पुनरूच्चार माजी खासदार जैन यांनी जामनेर येथील कौटुंबिक कार्यक्रमाप्रसंगी केला. याबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाही आपण स्पष्ट सांगितले असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. त्यामुळे जामनेर तालुक्यात जैन यांच्याशिवाय राष्ट्रवादीची नौका पार होईल का? असा प्रश्न सहाजिकच उपस्थित होतो.
गिरीश महाजन यांच्या विरोधात मी दोन निवडणूका लढलो. पहिल्या निवडणुकीप्रसंगी महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांच्या घरावर दगडफेक केली. त्यावेळी मी सुपारी बागेतून कार्यकर्त्यांसह महाजन यांच्या घराकडे जात असताना पुन्हा काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या वेळी अंधाराचा गैरफायदा घेऊन दगडफेक काय करता, समोर येऊन लढा, असे आव्हान कचरूलाल बोहरा यांनी होऊन केले होते.
त्यावेळी प्रचंड कटुता होती. मात्र, कालांतराने बराच बदल झाला. मंत्री गिरीश महाजन मला पित्यासमान मानतात, तर मी त्यांना मालमत्तेत वाटा न देण्याच्या अटीवर मुला-समान मानतो, असे सांगून नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या आजोबांपासून आपल्या कुटुंबाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांची ही त्यांनी या वेळी उजळणी केली. जामनेर वगळून मी राष्ट्रवादीचा आहे, असा उल्लेख मी एका भाषणात केला होता. याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मला विचारणा केली. मी प्रचाराला जाणार नाही, मात्र कुणाला मते द्यावे, हेही मी तालुक्यात सांगणार नाही. माझे कार्यकर्ते सुज्ञ आहेत, असे स्पष्ट करून जैन यांनी यापुढेही मंत्री महाजनांसोबतच असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्टच केले.