जळगाव (प्रतिनिधी) महाविकास आघाडीची तब्बल ११ मत फोडतं भाजपने तिसरी आणि धोक्याची जागा जिंकली आहे. दरम्यान भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांनीही या दाव्यामध्ये उडी घेत १ लाख रुपयांची पैज लावली होती. या दरम्यान देशमुख यांचे हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वीकारण्यात आले.
भाजपा नेते गिरीश महाजनांचा पीए अरविंद देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल पाटील यांच्यात राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून एक लाख रुपयांची पैज लागली होती. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार जिंकणार असं सांगत अरविंद देशमुख यांनी चॅलेंज केलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लाखांच्या पैजेचं आव्हानही दिलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे जळगावातील पदाधिकारी राहुल पाटील यांनी अरविंद देशमुख यांचं आव्हान स्वीकारलं. मात्र राहुल पाटील पैज हरला. त्यामुळे राहुलने शनिवारी दुपारी एक लाख रुपयांचा धनादेश अरविंद देशमुख यांना देण्यासाठी गिरीश महाजनांच्या जी. एम. फाउंडेशन या कार्यालयात आणला होता. मात्र देशमुख यांनी हा चेक न स्विकारता त्यांना तो परत केला व पैजेच्या विजयाचा केवळ एक रूपया घेतला. अरविंद देशमुख आणि राहुल पाटील यांच्यातल्या पैजेची राज्यभर चर्चाही रंगली होती.
याबाबत बोलताना गिरीश महाजनांचे पीए अरविंद देशमुख म्हणाले, गिरीश महाजन यांनी यापूर्वी झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये राजकीय गणितांची जुळवाजुळव यशस्वीपणे केली आहे. आताही राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यामुळं भाजपला निश्चित यश मिळेल, हा विश्वास असल्याने मी पोस्ट केली होती. मुळात ही पैज मी पैशांसाठी लावली नव्हती. म्हणून पैज जिंकल्यानंतर मी राहुल पाटील यांना धनादेश परत केला. एक सच्चा कार्यकर्ता म्हणून यांचा मला अभिमान वाटला.
देशमुख यांनी मोठ्या मनाने धनादेश स्विकारला नाही
तर राहूल पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे कार्य केले, तसेच आमचे नेते अजित पवार यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केल्याने संजय पवार निवडून येतील असा विश्वास होता. परंतु भाजपला यश मिळाले, आपण भाजपचे अभिंनदन करीत आहोत. पैज हरल्यामुळे आपण एक लाख रूपये रकमेचा धनादेश दिला परंतु देशमुख यांनी मोठ्या मनाने तो स्विकारला नाही.