जळगाव प्रतिनिधी : दुचाकीवरून जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातून धुमस्टाई लने चोरट्यांनी सोनपोत लांबविल्या. ही घटना शहरातील मोहननगर परिसरातून सीमा हसमुख सूर्यवंशी (वय ४३, रा. देवेंद्र नगर) यांची एक तोळ्याची सोन्याची चैन व दोन भाराची चांदीची चैन लांबविली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंगरोडवरून एका महिलेचीही सोनपोत लांबविली, मात्र या प्रकरणी महिलेने तक्रार दिली नसल्याने याप्रकरणी कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
शहरातील देवेंद्र नगरात राहणाऱ्या सीमा सूर्यवंशी या दि. २२ फेब्रुवारी रोजी रात्री दूध केंद्र बंद करून दुचाकीवरून घरी जात होत्या. त्या वेळी त्यांच्या दुचाकीच्या मागून एका दुचाकीवर दोन जण आले. त्यातील एका जणाने महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन व २ हजार रुपये किमतीची चांदीची चैन ओढून ते भरधाव वेगाने पसार झाले. या वेळी महिलेने स्वतःच्या दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला, मात्र ते मिळून आले नाहीत.
हाताने पकडून ठेवल्यामुळे वाचली पोत
दुसऱ्या घटनेत रिंगरोडवरून एक महिला दुचाकीने घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोनपोत ओढली. त्या वेळी लगेच महिलेने पोत एका हाताने पकडून ठेवली. मात्र तरीदेखील चोरट्यांच्या हाती तीन ग्रॅमचे मनी लागले. या प्रकरणी महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली नाही, त्यामुळे याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल केलेला नव्हता.
















