धुळे (प्रतिनिधी) भाजपाचे भिष्माचार्च लालकृष्ण आडवाणींनी ‘मंदीर वही बनाऐंगे’ अशी घोषणा देऊन ‘रथयात्रा काढली. हिंदूच्या भावनांना साद घालुन सत्ता प्राप्त करुन घेतली. केंद्रात स्वर्गीय अटलजींच्या नेतृत्वाखाली २३ पक्षांच सरकार आलं. तर उत्तर प्रदेशात कल्याणसिंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच सरकार आलं. पण कथित मंदीराचा प्रश्न काही सुटण्याची शक्यता दृष्टीपथात येत नव्हती. उत्तर प्रदेशामध्ये अब तो सरकार तेरी है, मंदीर में क्यु देरी है ? विरोधकांच्या या घोषणांनी भाजपामध्ये खळबळ माजली होती, अशा शब्दात माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी राम मंदीराच्या भ्रष्टाचारावर टीका केली आहे.
पत्रात म्हंटले आहे की, भाजपाला राम मंदीराचा प्रश्न सार्वत्रिक निवडणुकांमध्ये चघळण्यासाठी लटकवून ठेवायचा होता. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सोक्षमोक्ष लावून राम मंदीराचा प्रश्न राजकीय अर्जेंड्यावरून कायमस्वरुपी निकालीच काढून टाकला मंदीराच्या उभारणीकरिता जगभरातून कोट्यावधी श्रध्दाळू रामभक्तांनी अक्षरशः हजारोकोटी रुपये श्रध्देपोटी राममंदीर ट्रस्टच्या खात्यात जमा केले. राममंदीराचा विषय शेकडो कोटी जनतेच्या श्रध्देचा आणि भावनांचा आहे. तेवढ्या एकाच कारणामुळे भारतीय जनता पक्षाला राम मंदीराच्या शिडीवरुनच सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहचता आले.
जगभरातील रामभक्तांच्या भावना भाजपच्या पाठीशी होत्या. खरे तर, भाजपाने आपल्या पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर राममंदीराचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक होते. पण माननीय सर्वोच्च न्यायालयालाच अखेर या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करावा लागला. निवडणुकीच्या काळात केवळ अश्वासनांची खैरात करुन मते लुंगावली पण एकाही अश्वासनाची पुर्तता केली नाही. राम मंदीराच्या भुमीपूजनाचा कार्यक्रम धुमधडाक्यात व कोरोनाचे संकट असतांनाही पार पाडला. राममंदीराच्या कामामध्ये रामभक्त कुठलीही वेडीवाकडी घटना सहन करणार नाहीत. प्रभू रामचंद्रांनी सीता मातेच्या चारित्र्यावर शंका घेतल्यानंतर राजाचे चारित्र्य संशयातीत असले पाहिजे. याचा आदर्श निर्माण करण्याकरीता प्रत्यक्ष सीतेला अरण्यात सोडून दिले. अर्थात राममंदीराच्या निर्मितीही संशयातीत आसावी. ही रामभक्तांची अपेक्षा असणे स्वाभावीक आहे. ‘आप’ पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी कागदोपत्री पुराव्यासह सिध्द करुन दिले आहे की, राममंदीरासाठी आवश्यक असलेली जमीन खरेदी करण्यात थोडा-थोडका नव्हे तर चांगला १८.५० कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. केवळ ११ मिनीटांच्या अंतरात १८.५० कोटी रुपयाची अफरातफर व्हावी ही अत्यंत संतापजनक तेवढीच दुर्दैवी घटना होय. राज्यातील उथळ भाजपा नेत्यांनी वस्तुस्थिती खात्री करुन न घेता नेहमीप्रमाणे विरोधकांवर फुत्कार सोडले आहे.
आता तर, प्रत्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या यंत्रणेने व शंकराचार्यानीच शंका उपस्थित केली आहे. एक प्रकरण थंड होत नाही. तोवर ५ लाख रुपयांची जमीन २ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे नवीन प्रकरण बाहेर येत आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मकारकाच्या निर्मितीच्या टेंडर मध्ये सुध्दा थोडा-थोडका नव्हे तर, १००० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या उंची वरुनही शंका उपस्थित झालीच आहे. मागील पाच वर्षाच्या भाजप राजवटीत स्मारकांचे भुमीपूजन याशिवाय काही घडले नाही. प्रगती शुन्य आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील उंच पुतळ्यांच्या स्पर्धेत सरदार वल्लभभाई पटेल यांचा साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करुन दोन वर्षाच्या आत स्मारक उभारलेही! पर्यटन स्थळाचा दर्जाही दिला. रेल्वेही आली. पैसाही गोळा करता आहेत. पण आमच्या शिवाजी महाराजांचे स्मारक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक नुसत्या घोषणांमध्येच अडकवले आहे. माझ्यासारख्या कार्यकर्ता एवढेच सांगेल ‘अरे शिवाजी महाराज आंबेडकरांना सोडले नाही किमान प्रभु रामचंद्रांना तरी सोडा !” मंदीराचे पावीत्र्य राखा ! चित्रपटातील एका प्रसिध्द गाण्याचे बोल ‘देखो दिवानो एसा काम ना करो! ‘राम’ का नाम बदनाम ना करो !’ ज्या प्रभू रामचंद्रांच्या भावनात्मक प्रश्नाच राजकारण करून भारतीय जनता पक्ष सत्तेत पोहोचला त्याच प्रभू रामचंद्रांच्या मंदीर उभारणीच्या कामातील कथित भ्रष्टाचार भाजपवाल्यांना ‘हे राम’ म्हणायला लावेल. अखेर ‘राम नाम सत्य हैं ज्या प्रभू रामचंद्रांनी सत्तेवर बसवले तेच प्रभू रामचंद्र तुम्हाला सत्ताच्युत केल्याशिवाय राहणार नाहीत. असे सडेतोड पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष, माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी आज प्रसिध्दीस दिले आहे.