जळगाव (प्रतिनिधी) केळी पीक विम्याचे निकष बदलल्यानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं आता सोपं झालं आहे. यावरून खासदार रक्षाताई खडसे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांना टोला लगावला आहे. केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही. मात्र मंत्री ना. गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन द्यायला हवे, असं टोला त्यांनी लगावला.
केळी पीक विम्याचे निकष बदलल्यानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं आता सोपं झालं आहे. यावरून भाजप आणि महाविकासआघाडी यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. तसेच राज्याचे पाणी पुरवठा योजना मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावर जोरदार घणाघात केला होता. त्यावर आता रक्षाताई खडसे यांनी ना. गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
खासदार रक्षाताई खडसे यांनी ही शेलक्या शब्दांत मंत्री ना. गुलाबराव पाटील यांना उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, “मी गेल्या अनेक दिवसांपासून मुलांसोबत बाहेरगावी होते, या बाबत मी कोणतेही श्रेय घेतले नाही. माझे कुठेही वक्तव्य नाही, या मध्ये कोणाचेही श्रेय नाही, शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही मांडला, त्यामुळे राज्य सरकारला निकष बदलावे लागेल. मात्र, यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर टीका करावी याचे मला आश्चर्य वाटत आहे, ते मला वडीलांसारखे आहेत मुलगी म्हणून त्यांनी या मुद्द्यावर चांगले काम केल्याचे माझे कौतुक करून प्रोत्साहन देण्याची गरज होती.
काय म्हणाले होते ना. गुलाबराव पाटील ?
“हवामानावर आधारित फळपीक विम्याचे निकष राज्य शासनाने बदलले परंतु भाजप खासदार रक्षाताई खडसे या केंद्राने निकष बदलल्याचा खोटा दावा करीत आहेत, कुठे लग्न दिसले की आपला वाजा घेवून त्या ठिकाणी वाजविण्यास त्या हजर होतात,” असा टोला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी लगावला होता.