जळगाव (प्रतिनिधी) गुलाबराव वाघ माझ्या भावासारखे आहेत. त्यांनी कायमच मला सहकार्य केलेय. सोमवारच्या मेळाव्यातही जाण्याबाबत त्यांनी मला विचारले होते, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे.शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांनी आज एका दैनिकाशी साधलेल्या संवादात आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी गुलाबराव पाटील याना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी जळगाव आणि धरणगावच्या शिवसेनेच्या मेळाव्यात केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सोमवारी शिवसेनेच्या मेळाव्यात जाण्याबाबत गुलाबराव वाघ यांनी मला फोन केला. तसेच मी मेळाव्यात जात आहे, याबाबत त्यांनी सांगितले. गुलाबराव वाघ हे भावासारखे असून, त्यांनी आतापर्यंत मला मदतच केली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला मी उत्तर देऊ शकत नाही, असेही श्री. पाटील म्हणाले. तसेच शिवसेनेतील मंत्र्यांची कामे होतात. मात्र, शिवसेनेच्या आमदारांची छोटी-छोटी कामे देखील होत नाहीत. यामुळे आमदार नाराज असल्याची माहिती पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती. मात्र, पक्षप्रमुखांनी या माहितीकडे दुर्लक्ष केले. जर पक्षप्रमुख राज्यात फिरू शकत नाहीत. तर आदित्य ठाकरे यांनी राज्यात फिरून संघटनेचे मेळावे घ्यावेत असा ही सल्ला दिला. मात्र, आदित्य ठाकरेंनी देखील याकडे दुर्लक्ष केले. ८ महिन्यांपुर्वी संजय राऊत यांनाही आमदारांच्या नाराजीबाबत कल्पणा दिली होती. मात्र, तेव्हाही लक्ष दिले गेले नसल्यानेच आज ही वेळ शिवसेनेवर आली असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिले आहे. दुसरीकडे याबाबत गुलाबराव वाघ यांच्याशी संपर्क साधला असता ते एका शिवसेनेच्या मेळाव्यात व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांची अधिकृत प्रतिक्रिया आल्यानंतर वृत्त प्रकाशित करण्यात येईल याची वाचकांनी नोंद घ्यावी.