चोपडा (शाम जाधव) स्त्रीभ्रूण हत्या भारतात आजही होतात. हे विदारक सत्य असलं तरी, पोटच्या मुलींवर जीव ओवाळून टाकणारे पालकही आपल्या भारतात बघायला मिळतात. हे सुद्धा तितकंच खरं असून ते मान्य करायला पाहीजे. याचा प्रत्यय नुकताच पुन्हा एकदा आला. मुलीचा शिक्षणासाठी थेट लंडन येथील विश्वनामांकीत युनिव्हर्सिटीत नंबर लागला.
संधी राष्ट्रीय पातळीवरची, पण वार्षिक खर्च जवळपास पन्नास लाख रुपये इतका होता. तरीही मागचा पुढचा विचार न करता वडिलांनी आपली सर्व प्रॉपर्टी, मालमत्ता बॅंकेत गहाण (मॉर्गेज) ठेवली. मुलीला तिच्या पुढील उज्वल भविष्यासाठी विमानात बसवली.’ बेटी पराया धन ‘असते तरीही तिच्या शिक्षणासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारी माणसं इथं आजही आहेत. बापाचे हे धाडस नियतीला देखील आवडले. मुलगी मुळातच टॉप ची हुशार असल्याने तिला लागलीच महाराष्ट्र शासना कडून शंभर टक्के स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) बसली…एखाद्या पारिवारीक हिंदी चित्रपटाला शोभावी अशी ही घटना चोपडा शहरात घडली
काजीपुरा ता. चोपडा या ईवल्याश्या डोंगराळ भागातील गावातून मगनदादा परिवार काही वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त चोपडा शहरात वास्तव्यास आला. त्याच परिवारातील राजेंद्र शामराव पाटील आणि गुंजन राजेंद्र पाटील हे त्यातले कथानक. गुंजन लहानपणा पासून स्कॉलर…दहावीत मिमोसा क्लारा इंग्लिश मिडीयम स्कुल मधून ९४.७३% गुण मिळवत ती टॉपर ठरली. तर बारावीत महात्मा गांधी कॉलेज चोपडा येथे ७५ % मार्क्स पटकावले होते. फक्त अभ्यासातच नव्हे तर खेळातही स्केटिंगमध्ये ती राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवण्यात आधीच यशस्वी झाली होती.
म्हणतात ना ‘सोळावं वरीस धोक्याचं’ ते खरं आहे. या वयात निर्णय चुकला. विचार भरकटले पाऊल वेगळ्या वाटेने पडले. मग परत मुख्य प्रवाहात येणं कठीण असतं. पण ज्यांनी कोणी ‘धोक्याचं’ ऐवजी ‘सोळावं वरीस मोक्याचं’ हे ओळखलं त्याची लाईफ बनायला वेळ लागत नसतो. हेच गुंजनच्या बाबतीत घडलंय. हाती आलेल्या संधीचे सोने करीत. आपल्या आई वडीलांनी, परिवाराने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरत तीने फक्त शिक्षणावर फोकस केला. त्यामुळे सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या चोपडा या लहानश्या गावाचा आज नावलौकिक झाला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी हाती घेतलेला समाजोत्थानाचा वसा खऱ्या अर्थाने पुढे नेणाऱ्या भारतीय स्त्री मुक्तीच्या व शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांनी त्याकाळी सोसलेला सामाजिक त्रास त्याग त्या उपर त्यांनी दाखवलेली हिंम्मत. याचे फलीत काय असावे तर…आज स्त्री सरपंच आहे…आज स्त्री पोलीस अधिकारी आहे. स्त्री नगराध्यक्ष आहे… तहसीलदार, जिल्हाधिकारी आहे. आजची स्त्री आमदार आहे…खासदार आहे. एवढच काय तर सर्वोच्च राष्ट्रपतीपद देखील भारतात एका स्त्री ने भुषवलेले आहे.
‘चूल आणि मूल’ ही संकल्पना मोडीत काढून स्त्री मनाला नवीन पंख देण्याचे सत्कार्य जे त्याकाळी घडले. त्यामुळे महीलेला संधी मिळाली तर ती पुरुषा पेक्षा अधिक उंच भरारी घेऊ शकते. हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहेच. आणि तसे जीवंत उदाहरण मी अनुभवले. माझे मित्र राजेंद्र शामराव पाटील ज्यांना आम्ही राजुदादा म्हणतो. त्यांचा फोन आला. म्हणाले शामभाऊ माझी मुलगी ‘गुंजन’ लंडन ला शिकते हे तुला माहीत आहेच. ती युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमध्ये मेरीट ला आली आहे. सुखद धक्का बसला. एका छोट्याशा चोपडा शहरात जन्मलेली.. शिकलेली..वाढलेली मुलगी थेट साता समुद्रा पार शिक्षण क्षेत्रात आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर झेंडा गाडू शकते. तिच्या बद्दल काहीतरी लिहिले पाहीजे. चांगल्या गोष्टींचे समर्थन केलेच पाहीजे. जेणेकरून इतर मुलींना प्रेरणा मिळेल. म्हणून घरी जाऊन गुंजनची भेट घेतली. ती लंडनला शिकत असली तिथं मेरिटला आली असली तरी तिच्या बोलण्यातनं बडेजावपणा जाणवला नाही. उलट रिस्पेक्टिव्ह वागणं तिच्यात बघायला मिळालं.
चोपड्यात मेमोसा इंग्लिश स्कुलमध्ये दहावी बोर्डात प्रथम आलेली गुंजन आज युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे (M.S.) मॅनेजमेंट सायन्सचे धडे घेत आहे. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये गुंजन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शंभर टक्के मेरीटमध्ये आली आहे. हे सांगतांना तिच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव ओसंडून वाहतांना अनुभवला ती आज ज्या युनिव्हर्सिटीत शिकते आहे ते युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हे जगातील सातव्या क्रमांकाचे कॉलेज आहे. याच कॉलेजात आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी, रवींद्रनाथ टेगोर यांनी सुद्धा शिक्षण घेतलंय. हे ती गर्वाने सांगत असतांना पिता राजुदादाची छाती ५६ इंच झाली होती. राज्यातून पाच लाख अर्ज त्यातून फक्त १६ जणांची निवड त्यातही बिझनेस सायन्ससाठी एकट्या गुंजनची निवड होणे या साऱ्या संधी तिला चालून आल्या खऱ्या. पण शिक्षणासाठी देशाबाहेर पाठवणे ते ही मुलीला. काळजावर दगड ठेवून निर्णय घेणाऱ्या माय बापाला अर्थात राजुदादा व वहीनी सौ. वंदना पाटील यांचे कौतुक करावे तेवढेच कमीच आहे.
गुंजनच्या प्रत्येक शब्दात आई-वडिलांविषयी आदर कृतज्ञता जाणवते. संस्कार हे पेरावे लागतात. तेव्हाच उगवतात याची प्रचिती गुंजन कडे बघून येते. घरात मुलगा (लहान भाऊ) असतांना आई वडिलांनी त्याच्या पेक्षा अधिक प्रेम मला दिलं जास्त लक्ष माझ्याकडे दिलं. माझी कोणतीही परीक्षा असायची त्यावेळी सगळ्यांचीच परीक्षा असायची की काय? असा माहोल घरात तयार व्हायचा. आई-वडील फार तर बारावी शिकलेले असतील तरी एव्हडा समंजस पणा त्यांच्यात ठासून भरला होता. त्यामुळे हे सारं शक्य झाल्याचं गुंजन आवर्जून सांगते. तिच्या यशाचं सफलतेचं सारं श्रेय ती वडील राजेंद्र पाटील यांना देते.या सोबतच काका राकेश पाटील काकू सौ.शैलजा पाटील यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अशिक्षित होत्या. आपल्या जिल्ह्यातल्या कवयित्री बहीणाबाई अशिक्षित होत्या. मात्र आपल्या प्रगल्भ विचार क्षमतेच्या जोरावर त्या आजही आमच्या साठी पूजनीय आहेत. ‘नासा’ या संस्थेत अनेक भारतीय आपले स्थान बळकट करून आहेत. ‘गुगल’ असेल अनेक परदेशी कार्पोरेट कंपन्या असतील भारतीय प्रत्येक ठीकाणी आपली ओळख टिकवून आहे. भविष्यात आपली गुंजन देखील आपल्या गावाची..शहराची..राज्याची.. देशाची..मान उंचावेल याच तिला शुभेच्छा.
मुलीचा शिक्षणासाठी परदेशात नंबर लागला तेंव्हा अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. त्या मित्र मंडळींचे, मालमत्ता गहाण ठेवत असलो तरी कुठलाही विलंब न करता अथवा जाचक अटी-शर्ती न दाखवता कर्ज मंजूर करून देणाऱ्या बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा चोपडा यांचे आणि सगळ्यात महत्वाचे स्त्री शिक्षणासाठी शंभर टक्के अनुदान देणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे आभार मानावे तितके कमी असून, आपण सदैव सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो. अशी कृतज्ञतेची भावना राजेंद्र पाटील यांनी शेवटी बोलतांना व्यक्त केली.
शाम जाधव
मुख्य संपादक-दै.खान्देश एक्सप्रेस
अध्यक्ष-प्रेरणा दर्पण फाऊंडेशन,चोपडा.
9822325717 : 9834634935