मुंबई (वृत्तसंस्था) हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा देण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्यानंतर काही तासातच त्यासंबंधी मान्यता मिळाली. याला “ठाकरे ब्रँड” म्हणतात, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकारला टोला लगावला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात चिंतेचे वातावरण पसरलं आहे. तर राज्यातही कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. या संकटाच्या काळात कोरोना लसीकरणाची मोहिम जास्तीत जास्त वाढवण्याकडे सरकारचा कल आहे. त्यासाठी लस उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारने हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतर पद्धतीने कोव्हॅक्सिन बनवण्याची मान्यता दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हाफकिनला लस उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसांत हा निर्णय झाल्याने मनसेने याचं श्रेय घेतलं. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं की, राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिंगला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली याला म्हणतात “ठाकरे ब्रँड”. कोरोना काळात “राजकारण” नको म्हणण्याऱ्यानी आभार मानायला हरकत नव्हती असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे.
राज ठाकरेंचं ट्वीट
१०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की, असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.