जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कांताई नेत्रालयाच्या मागील बाजूस असलेल्या हर्षवर्धन कॉलनी आणि प्रज्ञा कॉलनीत गटारींचे सुरू असलेले काम अनेक महिन्यांपासून रखडले असून त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. नागरिकांनी याबाबत महापौरांकडे तक्रार केली असता महापौर सौ.भारती सोनवणे यांनी प्रत्यक्षात भेट देत पाहणी केली. महापौरांनी मक्तेदार आणि मनपा अधिकाऱ्यांना खडसावत गटारींची सर्व कामे ८ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
हर्षवर्धन कॉलनी आणि प्रज्ञा कॉलनीतील गटारींची कामे गेल्या अनेक महिन्यापासून मंजूर केलेली असून अद्यापही पूर्ण झालेली नाही. जुन्या गटारी तोडलेल्या असल्याने पाणी तुंबून नागरिकांना दुर्गंधी आणि आजारांना सामोरे जावे लागत आहे. घरासमोर गटार खोदलेली असल्याने नागरिकांना कसरत करीत ये-जा करावी लागत आहे. नागरिकांनी याबाबत महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे तक्रार केली होती. मंगळवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सकाळी परिसरात भेट देत कामाची प्रत्यक्षात पाहणी केली. परिसरातील नागरिकांशी चर्चा करून सर्व परिस्थितीचा महापौरांनी आढावा घेतला. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, प्रतिभा पाटील, मनपा अधिकारी प्रकाश पाटील आणि नागरिक उपस्थित होते.
गटारींची तात्काळ स्वच्छता करा
परिसरात गटारींचे काम सुरू असून अनेक गटारी महिन्याभरापासून साफ केल्या जात नसल्याने डास, मच्छरांचा त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी तात्काळ आरोग्य विभागाला सूचना देत गटारी साफ करण्याच्या सूचना केल्या.
गटारींची कामे ८ दिवसात पूर्ण होणार
गटारींची कामे सुरू झाली असून जुने तळ सिमेंटचे असल्याने खोदकाम करण्यास अडचण येत असल्याचे मक्तेदाराने सांगितले. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मक्तेदाराला सूचना देत रात्रंदिवस काम करून आठ दिवसात पूर्ण करण्याचे सांगितले. तसेच मनपा अधिकाऱ्यांना सूचना देत सर्व कामे नियमानुसार लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे सांगितले.