नवी दिल्ली (वृत्तसंस्था) परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे गंभीर असून त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे सर्वाधिकार आणि निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असेल असंही सांगितलं.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी लावून धरली आहे. पण, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे, ते योग्य तो निर्णय आम्हाला विचारून घेतील, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणावर आपली भूमिका मांडली. ‘राज्याच्या गृहमंत्र्यांच्या विरोधात आरोप करण्यात आले आहे. हे अतिशय गंभीर आहे. त्यांच्या पत्राचे दोन भाग आहे. त्यांच्या पत्रामध्ये, प्रत्यक्ष पैसे जमा करण्याविषयी कोणतीही माहिती नाही. हे पैसे कुठून घेतले आणि ते कधी हस्तांतरित केले गेले, याविषयी पत्रात काहीही सांगण्यात आले नाही. त्या पत्रावर परमबीर यांची सही नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.
तसंच ‘परमबीर सिंग यांनी पत्रात माझा उल्लेख केला आहे आणि आम्ही भेटलो देखील आहे. सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंग यांनीच घेतला होता. सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतला नाही’ असंही शरद पवार म्हणाले. ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. आमच्याशी बोलल्यानंतर ते निर्णय घेतली. यावर अजून चर्चा झाली नाही, चर्चा करू. तसंच या प्रकरणी मी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली नाही, असंही पवारांनी स्पष्ट केले.