पुणे (वृत्तसंस्था) घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्न करायचे विसरलो, अशी अवस्था शिंदे गटाची झाली आहे. त्यांना आता मळमळत आहे. गरगरत आहे, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे.
मुख्य संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जहरी टीका केली आहे. घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्न करायचे विसरलो, अशी अवस्था शिंदे गटाची झाली आहे. त्यांना आता मळमळत आहे. गरगरत आहे. क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरु झाली. शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी ‘स्ट्रेचर’ व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो,” असा टोमणा शिवसेनेनं शिंदे गटाला हाणला आहे.
शिंदेच्या कामाचा उत्साह व उरक दांडगा आहे. कोणताही व्हायरस त्यांच्या अवतीभवती फिरत नाही. तरीही मुख्यमंत्री शिंदे आजारी पडावेत हे त्या ‘चाळीस’ जणांसाठी चिंताजनक आहे. शिंदे यांना नक्की कोणता आजार जडला आहे हे त्यांनाच माहीत, पण सर्वोच्च न्यायालयात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्यामुळे अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राची राजकीय प्रकृती बिघडलीच होती, पण ज्यांच्या फुटीरतेच्या किंवा विश्वासघाताच्या ‘डायरिया’मुळे राज्याची प्रकृती खालावली ते मुख्यमंत्री शिंदेही आजारी पडल्याचे वृत्त अलिबाबा आणि चाळीस चोरांसाठी चिंताजनक आहे. मनुष्यप्राणी व त्याचे शरीर म्हणजे एक यंत्र आहे. त्यात अधूनमधून बिघाड होणारच, पण शिंदे हे किमान 20 ते 22 तास न झोपता काम करतात,” असे मिश्लिलपण अग्रलेखात म्हटलं आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की…शिंदे व त्यांच्या चाळीसेक आमदारांनी शिवसेनेचा त्याग करून स्वतंत्र गट स्थापन केला, पण ‘आमचीच शिवसेना खरी’ असा दावा त्यांनी केला. हा विनोदाचा भाग झाला. उद्या शिंदे व त्यांचे लोक ग्वाल्हेरला जातील व जिवाजी राजे शिंदे यांच्या सर्व मालमत्तेवर हक्क सांगतील. ”तुम्ही कसले शिंदे? तुम्ही कसले सरदार? तुम्ही अशी काय मर्दुमकी गाजवली? मीच खरा शिंदे. त्यामुळे ग्वाल्हेरचा राजा मीच!” असा दावा करायलाही हे लोक कमी करणार नाहीत व त्यांची मानसिक अवस्था पाहता असे दावे ते करू शकतात.
शिंदे टोळीने विश्वासघात केला
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटास फार टोकदार प्रश्न विचारला आहे की, ”तुम्ही बंडखोर नाही तर नेमके कोण आहात?” न्यायालयाने त्यांना आणखी एक प्रश्न विचारला, ”पक्षाचा नेता भेटत नाही म्हणून नवा पक्ष स्थापन करू शकता का?” या दोन्ही प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहेत. मुख्यमंत्रीपदाची लालसा व ईडी वगैरेंच्या कारवाया यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी शिंदे व त्यांच्या टोळीने विश्वासघात केला.
नव्या औषधोपचारासाठी शिंदे आजारी पडले
विधिमंडळातील पक्ष फोडला म्हणजे संपूर्ण पक्ष फुटला असे नाही. शिंदे गटाकडे कायद्याने दोनच पर्याय आहेत. एक तर त्या सर्व लोकांनी राजीनामे द्यावेत व पुन्हा निवडून यावे. दुसरे म्हणजे, या फुटीर गटाने दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन व्हावे, असा पेच शिंद्यांपुढे पडला आहे. त्याला त्यांच्या गटातील किती आमदार होकार देतील हा प्रश्नच आहे. पुन्हा मंत्रिपदासाठी त्यांच्या गटात मारामाऱ्या होणार, हेही उघड आहे. त्यामुळे नव्या औषधोपचारासाठी शिंदे हे आजारी पडले असावेत.
तलवारी तुटल्या..
शिवसेनेचे ‘धनुष्य बाण’ चिन्ह आम्हालाच मिळेल व आमचीच सेना खरी या त्यांच्या दाव्यातील पोकळपणाही उघड झाला आहे. शिवसेनेच्या धनुष्य बाणावर सध्या कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. त्यातूनही अनेकांना नवे आजार जडू शकतात. एक गोष्ट मान्य केली पाहिजे, शिवसेनेची बाजू सत्याची आहे व 56 वर्षांच्या आयुष्यात शिवसेनेने विश्वासघाताचे असे हलाहल अनेकदा पचवले आहे. त्यामुळे घाव घालणाऱ्यांच्याच तलवारी तुटल्या, असे इतिहास सांगतो.