कोल्हापूर (वृत्तसंस्था) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, “आता मी उभ्या-उभ्या जास्त बोलत नाही, झोपेत सरकार कोणी आणलं? तुम्ही आणलं, शरद पवार साहेबही झोपेतून उठायचे होते. तोपर्यंत तुम्ही शपथविधी करुन मोकळे झालात. त्यामुळे झोपेत कसं सरकार आणायचं, हे तुम्हाला माहीत आहे. मी आपलं उपरोधिकपणे म्हणालो. मला असं वाटत होतं की, अजित पवारांसारखे भरपूर वर्ष राजकारणात असलेले नेते यांना आपण काल काय केलं याची आठवण असेल. पण त्यांना बहुतेक आपण काल काय केलंय याची आठवण नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून तीन दिवसांसाठी का होईना सरकार केलं, त्यांच्यावर टीका करताना काहीतरी विचार करा.”
“देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना तलवारीचा धाक दाखवून शपथविधीसाठी नेलं नव्हतं. विचारपूर्वक केलं ना. तुम्हाला तुमचे २८ आमदार बरोबर आणले ते ठेवता आले नाहीत. सगळे शरद पवारांकडे पळून गेले. त्यानंतर तुम्ही महाविकास आघाडीतही उपमुख्यमंत्री आणि फडणवीसांसोबत स्थापन केलेल्या सरकारमध्येही उपमुख्यमंत्रीच. आता माहीत नाही उद्या पुन्हा नवं सरकार स्थापन होईल, त्यातही तुम्हीच उपमुख्यमंत्री असाल, तुम्ही मात्र सगळीकडे पाहिजे. तत्व नाही, व्यवहार नाही, कशाची कशाला सांगड नाही. ज्याचं सरकार त्याच्यासोबत मी जाणार, हे एकच तत्व. अजितदादा… जरा सांभाळून बोला, आम्ही फाटके आहोत, आम्ही बोलायला लागलो तर महागात पडेल.”
काय म्हणाले होते अजित पवार?
ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, अशी नवी गर्जना करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं, असा प्रश्न अजितदादांनी विचारला.
ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आलं, तेव्हापासून भाजप नेत्यांना असह्य झालंय. त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असतं. कार्यकर्त्यांनी सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत राहतात. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार राहणार, असे अजित पवार यांनी सांगितले होते.