नाशिक (वृत्तसंस्था) ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना निंदनीय असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पण मनाविरुद्ध लिहल्यामुळे एखाद्यावर हल्ला करणे चुकीचे आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.
मागील पाच सहा महिन्यांपासून हा जो वाद सुरू होता. एक पुस्तक कुबेर यांनी लिहिलं आहे, जे मी स्वत: वाचलेलं आहे. कुबेर यांची मतं.. लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार असल्याने व्यक्त करण्याची भूमिका ते घेऊ शकतात. त्या मतांचा विरोध करणारे, दुसरेही घटक असू शकतात. या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आपण स्वीकारलेलं आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यानंतर आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट एखाद्या लेखकाने लिहिली तर त्याच्यावर व्यक्तिगत हल्ला करणे, ही गोष्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे आणि आम्ही कुणीही त्याचा पुरस्कार कधी करणार नाही. ही घटना निंदनीय आहे. या गोष्टी, घटना महाराष्ट्राला शोभत नाही आणि विशेषत: शिरवाडकर यांच्या नावाने ज्या परिसरात हा मराठी जणांचा सोहळा इतक्या उत्साहात आणि उत्तमरित्या सुरू आहे. अशा परिसराच्या जवळ हा प्रकार घडणं, कठेही घडणं चुकीचं आहे. इथे घडणं आणखीनच चुकीचं आहे.” अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
तर, या शाईफेकीच्या घटनेवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारे साहित्यसंमेलनात जाऊन शाईफेक करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. साहित्यसंमेलन हे अभिव्यक्तीचं केंद्र असतं आणि समजा तुम्हाला दुसरी अभिव्यक्ती करायची असेल, तर तुम्हाला कुठेही करता येते. पण अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायाची आणि शाईफेक करायची हे योग्य नाही.” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.