मुंबई (वृत्तसंस्था) ‘कोविडची लागण झाल्यामुळं ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान मी अॅलेक्सिस रुग्णालयात होतो. तिथून १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज झाला तेव्हा हॉस्पिटलच्या गेटवर अनेक पत्रकार उभे होते. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. नुकताच कोविडमधून बाहेर पडल्यामुळं माझ्या अंगात त्राण नव्हता. त्यामुळं गेटवरच खुर्चीवर बसलो आणि काही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. असं स्वत: देशमुख यांनी पुढं येऊन १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात खुलासा केला आहे.
परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आज सकाळपासून राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेची चर्चा सुरू झाली आहे. सकाळी शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत “परमबीर सिंग यांनी उल्लेख केलेल्या दिवसांमध्ये अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात होते”, असं म्हणत पाठराखण केल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेचे ट्विट रीट्विट करत शरद पवारांनाच उलट सवाल विचारण्यात येत आहेत. त्यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा करणारं स्पष्टीकरण दिलं आहे.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप करताना देशमुख आणि एसीपी पाटील यांच्यात भेट झाल्याचे सांगितले होते. या भेटीत देशमुख यांनी पाटील यांना कलेक्शनचे टार्गेट दिल्याचं परमबीर सिंग यांनी म्हटलं होतं. त्यासाठी पाटील यांच्यासोबत झालेल्या स्वत:च्या संभाषणाच्या व्हॉट्सअॅप चॅटचा पुरावा सिंग यांनी दिला होता. त्यात १६ मार्च ही तारीख नमूद करण्यात आली होती. मात्र, ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अनिल देशमुख रुग्णालयात होते. त्यानंतर ते २७ फेब्रुवारीपर्यंत ते होम क्वारंटाइन होते, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितलं.
१५ फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे व्हिडीओ विरोधकांकडून ट्वीट केले जात असताना अनिल देशमुखांनी ती पत्रकार परिषद रुग्णालयाबाहेरच घेतली असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “मला कोविड झाल्यामुळे मी ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. १५ फेब्रुवारीला माझा डिस्चार्ज झाला. त्यावेळी मी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना गेटवर काही पत्रकार होते. त्यावेळी माझ्या अंगात त्राण नव्हता. तेव्हा मी हॉस्पिटलमध्येच खुर्चीवर बसलो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यानंतर मी घरी जाऊन होम क्वारंटाईन झालो. १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत मी होम क्वारंटाईन होतो. २८ फेब्रुवारीला मी पहिल्यांदा बाहेर पडत सह्याद्री गेस्टहाऊसला मीटिंगला गेलो”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.