मुंबई (वृत्तसंस्था) सचिन वाझे यांच्या आरोपाला अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. सचिन वाझेनं लिहिलेल्या पत्रात माझ्यावर काही आरोप करण्यात आलेत. ते सर्व आरोप धादांत खोटे आहे. मी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. ते माझे दैवत आहे. त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो माझ्यावरील आरोपांमध्ये काडीचंही तथ्य नाही, असं अनिल परब म्हणाले.
‘एनआयए’कडून अटक करण्यात आलेले मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मीडियाला एक पत्र लिहून राज्यातील तीन महत्वाच्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. यात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी वसुलीचं टार्गेट दिल्याचे आरोप केले आहेत. या आरोपांबाबत अनिल परब यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले आहेत. सचिन वाझे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर पत्राद्वारे गंभीर आरोप केले आहेत. पण हे आरोप परब यांनी फेटाळले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
अनिल परब नेमकं काय म्हणाले?
आज सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात एक पत्र दिलंय. त्या पत्रात त्यांनी माझा उल्लेख केला आहे. मी सचिन वाझे यांना बोलावलं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. २०२० च्या जून, ऑगस्टमध्ये सचिन वाझे यांना एसबीयूटी प्रकरणामध्ये ट्रस्टींकडून ५० कोटी जमा करण्याचे आदेश मी त्यांना दिले, असा गंभीर आरोप वाझे यांनी पत्रात केला आहे. जानेवारी २०२१ मध्ये मी मुंबई महापालिकेचा क्रॉन्ट्रक्टरकडून प्रत्येकी दोन कोटी जमा करण्याच्या सूचना दिल्या, असा दुसरा आरोप त्यांनी केलाय. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. माझ्यावर अशाप्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाही. म्हणून मी माझ्या दोन मुली आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे सर्व खोटं आहे. हे मला नाहक बदनाम करण्यासाठी आरोप करण्यात आले आहेत.
भाजपचे पदाधिकारी आरडाओरड करत होते. या प्रकरणात आम्ही तिसरा बळी घेऊ, असं ते म्हणत होते. याचा अर्थ त्यांनी दोन-तीन दिवसांपासून हे प्रकरण शिजवलं आहे. त्यांनी सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण तयार केलं आहे. सचिन वाझे पत्र देणार हे कदाचित त्यांना माहिती होतं. त्यामुळे केंद्रीय यंत्रणेला हाताशी धरुन त्यांनी आरोप केले आहेत. या पत्रात वाझेंनी माझ्यावर, अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचा माणूस म्हणून एकावर आरोप केले आहेत. पण त्याने केलेले दोन आरोपांशी माझा काहीच संबंध नाही. महापालिकेच्या कुठल्याही कंत्राटदारासी माझी ओळख नाही. त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे.