चाळीसगाव (प्रतिनिधी) एक वर्षाच्या आत समाजासाठी १५ लाख रुपयांचा सभामंडप बांधून देईन, असे जाहीर आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात नुकतेच दिले.
येथे सकल नाभिक समाजाच्या वतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली. खरजई नाका येथून सुनिल नेरपगार यांच्या दुकानापासून श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक श्री संत सेना महाराज मंदिरावर आल्यानंतर त्याठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री संत सेना महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अध्यक्ष प्रदीप देशमुख, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाजातील मयत सभासद यांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले. कोकिळा चित्ते व गणेश सोनवणे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्याकडून तसेच इयत्ता दहावी व बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींना बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिवाजी बहाळकर, लोटन सोनवणे, गणेश सोनवणे, किरण नेरपगार, सुनिल नेरपगार, प्रेमराज सैंदाणे, दिपक सोनवणे, सुरेश वेळीस, प्रविण गवळी, नीलेश महाले, मच्छिंद्र वाघ, दत्ता आहिरे, बंटी बोरसे आदींनी सहकार्य केले.