मुंबई (वृत्तसंस्था) कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील एनसीबीचा छोपा बोगस होता, असा दावा करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत. वानखेडे यांच्यावर मलिक यांनी वैयक्तिक आरोपही केले असून हे आरोप खोटे ठरल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, अशी घोषणाच आता मलिक यांनी केली आहे.
आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक वानखेडेंविरोधात अनेक दावे ते करत आहेत. मलिकांच्या आरोपांना काल समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही हिंदूच आहोत हे देखील तिने ठासून सांगितलं. पण मलिक त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.
मी आतापर्यंत समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहे. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा ठरल्यास मंत्रिपद सोडायला तयार आहे. मी केलेले आरोप खोटे ठरवून दाखवा, असं आव्हानच मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांना दिले आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडे यांचा जो मुद्दा समोर आणत आहे तो त्याच्या धर्माचा नाही. ज्या फसव्या मार्गाने त्याने IRS ची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आणि त्यामुळे एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले आहे, ते मला समोर आणायचे आहे, असं ट्विट करत बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे समीर वानखेडेंनी फसव्या मार्गाने नोकरी मिळवल्याचा मलिक यांनी म्हटलं आहे.