औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असं काही वक्तव्य केलं की ज्यामुळे शिवसेना – भाजपची पुन्हा युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झालीये. “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटल.
मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली. “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे त्यावरून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना मागे वळून व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींकडे पाहिलं. यावेळी व्यासपीठावर रावसाहेब दानवे आणि भागवत कराड हे देखील उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या विधानामधून शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याचेच तर संकेत द्यायचे नव्हते ना? याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
“व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो, मातांनो… आजचं हे व्यासपीठ आणि कार्यक्रम पाहून मला समाझान आहे की आपण सगळेच जण राजकारण बाजूला ठेऊन जनतेच्या हिताच्या गोष्टी आपण करत आहोत. नाहीतर मराठवाडा मुक्तीदिन साजरा करायचा आणि आपापसात भांडण करायचं. मग निजामाला कशाला घालवलं? नालायकपणे कारभार करून आपणही तसेच वागत राहिलो, तर त्या आणि या राजवटीमध्ये काय फरक राहिला? अपेक्षा एकमेकांकडून असणारच आहेत”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.