मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभेनंतर शिवसेनेसोबत युती केली असतं तर सरकारमध्ये आलो असतो. राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यापेक्षा शिवसेनेसोबत युती केली असती तर कदाचित दोघं राज्यात आले असते. अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तर नैतिक आणि आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक हा कोणता न्याय आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
“आधी सर्वांशी सल्लामसलत करुन निर्णय व्हायचे, पण आता भाजप ही व्यक्तिगत आहे. एका व्यक्तीने निर्णय घ्यायचा आणि सर्वांनी मान्य करायचा,” असं एकनाथ खडसेंनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंच्या टीकेला उत्तर देताना कोणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, त्यांनी मला ठरवलं असं म्हटलं आहे. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना खडसेंनी “मी फडणवीसांना व्हिलन ठरवलं नाही असं स्पष्ट केलं. “आयुष्यभर ज्यांनी चारित्र्य जपलं, त्यांच्यावर तुम्ही असे आरोप करता,” अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. “देवेंद्र फडणवीस जोपर्यंत पक्षात आहे, तोपर्यंत मला न्याय मिळणार नाही अशी माझी भावना झाली, म्हणून मी पक्ष सोडला. मी पक्षाला दोष दिला नाही, नेतृत्वाला दिला. एकाही नेत्याने भाजपा सोडणार कळाल्यावर फोन केला नाही. चार दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी फोन केला. मी अमित शाह, पंतप्रधान मोदी यांनाही भेटलो,” अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
“अनेक लोक भाजपामध्ये नाराज आहे, चंद्रकांत पाटीलही आता स्वत: निर्णय घेऊ शकत नाही, त्यांनाही फडणवीसांना विचारुन निर्णय घ्यावे लागतात,” असा गौप्यस्फोट खडसेंनी केला आहे. “शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिघांकडून मला ऑफर होत्या, पण राष्ट्रवादीत या ठिकाणी विस्ताराला वाव आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला,” असं ही खडसेंनी सांगितलं आहे.