कोलकाता (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाम आणि पश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यावेळी बांकुरा येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींवर टीका केली. दिदी तुमची इच्छा असेल तर माझ्या डोक्यावर पाय ठेवू शकता, मला लाथ मारू शकता, पण मी तुम्हाला बंगालच्या स्वप्नांना लाथ मारू देणार नाही, असे मोदींनी ममतादीदींना सुनावले.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या तारखा जवळ येत असतानाचा भाजपनं प्रचारासाठी पूर्ण जोर लावला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये यावेळी काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. बंगालमधील जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी भाजपकडून अनेक सभा आणि रॅली आयोजित केल्या जात आहेत. रविवारीदेखील गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगाल दौऱ्यावर आहेत. अशात बांकुरा येथील सभेतून जनतेला संबोधित करताना पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.
रविवारी सकाळी आसामच्या बोकाखाट येथे पहिली सभा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी सायंकाळी बांकुरा येथील सभेला पोहोचले होते. या सभेत बंगालमध्ये परिवर्तन घडवणार असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला. यावेळी मोदी म्हणाले की, आजकाल दीदी माझ्यावर आपला राग काढत आहेत. त्यांचे लोक पोस्टर बनवत आहेत, ज्यामध्ये माझ्या डोक्यावर दिदीचे पाय दाखवले जात आहेत. दीदी मााझ्यासोबत फुटबॉल खेळत असल्याचं ते दाखवत आहेत, असं सांगत मोदींनी पुढे त्यांना एक सल्लादेखील दिला आहे. पंतप्रधान म्हणाले, दिदी तुमची इच्छा असेल तर माझ्या डोक्यावर पाय ठेवू शकता. तुम्ही मला लाथ मारू शकता, मात्र मी तुम्हाला बंगालच्या विकासाला लाथ मारू देणार नाही. ‘२ मई, दीदी गई’ असा पक्का निर्धार बंगालच्या जनतेने केल्याचेही ते म्हणाले.
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले, दीदी तुमचा किल्ला आता कोसळला आहे. मी तुम्हाला आदिवासींच्या स्वप्नांना लाथ मारू देणार नाही. आम्ही बंगालच्या सरकारला कित्येक करोडो रुपये दिले आहेत. मात्र, अजूनही येथील बहिणी आणि मुली पाण्याच्या एका एका थेंबासाठी चिंतेत आहेत. पुढे मोदींनी नळ कुठे आहेत दिदी ? असा सवालही उपस्थित केला आहे. अनेक योजना प्रत्यक्षात का उतरल्या नाहीत. वर्षात शेतकरी केवळ एकदाच पिकं घेऊ शकतात असं का? असे अनेक सवाल मोदींनी ममता यांच्या टीएमसी सरकारला केले आहेत.
















