धरणगाव (प्रतिनिधी) पालिका निवडणुका कोणत्याही क्षणी लागतील अशी शक्यता आहे. तशात धरणगावात निवडणुकीच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाल्यामुळे वातावरण अधिकच गरम झाले आहे. दरम्यान, धरणगावकरांचा कौल कोणता राजकीय पक्ष, नेता…जाणून घेतोय याचीही खमंग चर्चा रंगली आहे.
धरणगावात पालिका निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यातून दररोज सोशल मीडियात तू-तू…मैं…मैं सुरु असते. तर दुसरीकडेकडे शिवसेनेत दोन गट पडल्यापासून तर या वादात अधिकची भर पडली आहे. अगदी दररोज कोणते तरी कारण शोधून आंदोलन केले जाते. काहीच नसले तर निवेदन दिली जाते. सुज्ञ नागरीक गद्दार-खुद्दारच्या खेळण्याला मात्र, आता कमालीचा त्रस्त झाला आहे. थोडक्यात एकीकडे धरणगावच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडवणे सुरु असतांना दुसरीकडे गपचूप कुणीतरी राजकीय सर्वेक्षण करून घेत असल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील एका प्रख्यात कंपनीला या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले असून ही कंपनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्राथमिक माहिती गोळा करत आहेत, जसे जळगाव ग्रामीण मतदार किती जि.प., पं.स सदस्य आहेत?, किती नगरसेवक आहेत?, मतदार संख्या किती? या सारख्या काही प्रश्नांचा समावेश होता. दरम्यान, जि.प., पं.स आणि पालिका निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे हे सर्वेक्षण कोणता तरी राजकीय पक्ष किंवा कोणता तरी नेता करून घेत असल्याचे स्पष्ट आहे. यातून धरणगावकरांचा कौल नेमका काय असेल याचा अंदाज बांधला जात असल्याचेही स्पष्ट आहे.