जळगाव (प्रतिनिधी) बँकेत कामाला असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायीकाचे बंद पडलेल्या क्रेडिट कार्डवरुन संशयित आरोपीने परस्पर १ लाख १३७ रुपयांची रोकड काढून घेतली. पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिल्यानंतर ९७ हजार रुपये बांधकाम व्यावसायीकाच्या खात्यावर जमा केले. तसेच उर्वरीत रक्कम न दिल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगरात विनोद हंसराज बडगुजर (वय ४८) हे बांधकाम व्यावसायीक वास्तव्यास आहे. त्यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले असल्याने त्यांना वर्षभरापुर्वी क्रेडीट कार्डसाठी फोन आला होता. त्यांनी क्रेडीट कार्डसाठी संमती दाखविल्यानंतर कपील पाटील हा त्यांच्या पत्त्यावर आरबीएल बँकेचे सुपर क्रेडीट कार्ड घेवून आला होता. परंतु दोन महिंन्यापासून क्रेडीट कार्डचा वापर न केल्यामुळे त्यांचे कार्ड बंद झाले होते. त्यानंर ४ ऑगस्ट रोजी कपील पाटील हे पुन्हा बडगुजर यांच्या घरी गेला. त्याने तुमचे बंद पडलेले कार्ड जमा करण्यासाठी आले असल्याचे सांगून त्याने ते कार्ड जमा करुन घेतले.
गुरुवार ८ ऑगस्ट रोजी आरबीएल बँकेतून बडगुजर यांना फोन आला. त्यांनी तुम्ही क्रेडीट कार्डद्वारे १ लाख १३७ रुपये खर्च केले असून त्यासंबंधी तुम्ही कितीचा हप्ता भरणार आहे अशी विचारणा केली. त्यावर बडगुजर यांनी माझे कार्ड बंद पडले असल्याचे सांगून कपील पाटील हा ते कार्ड घेवून गेल्याचे त्यांना सांगितले. बँकेने बडगुजर यांना तुमची फसवणुक झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी कार्ड बंद करण्यास सांगितले.
दरम्यान, तक्रार देण्यासाठी बडगुजर हे पोलीस ठाण्यात आले. याप्रसंगी कपील पाटील याने चौकशीत ९७ हजार रुपये क्रेडीट कार्डवर जमा केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र अद्याप देखील त्याने ३ हजार १३७ रुपये जमा केले नाहीत. दरम्यान, बडगुजर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता कपील राजू पाटील (वय ३१, रा. चंदू आण्णानगर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनवणे हे करीत आहे.