जळगाव (प्रतिनिधी) जळगावातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी नक्षलग्रस्त भागातील लोकांप्रमाणेच पेहराव करून ओडिशा राज्यातील आरोपीला अटक केली आहे. कॉंग्रेस नारायण कुढेही (वय २६, रा. पंडापदर, ता.रामपूर जि.कालाहंडी) असं अटकेतील संशयिताचं नाव आहे.
केवायसी च्या नावाखाली फसवणूक
जळगाव शहरातील गजानन कॉलनीतील रहिवासी अनुपमा प्रभात चौधरी यांना केवायसी करण्यासंदर्भात अनोळखी इसमाचा फोन आला होता. यादरम्यान संबंधिताने एक लिंक मोबाइलवर पाठवली. तसंच आलेला ओटीपी क्रमांक मिळवून अनुपमा चौधरी यांच्या बँक खात्यातून १० हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी अनुपमा चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
संशयित ओडिशा राज्यातील
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह कर्मचार्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास करत संशयित निष्पन्न केला. यात संशयित हा ओडिशा राज्यातील असल्याचं समोर आल्यानंतर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी संशयितांच्या शोधासाठी हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील, पोलीस नाईक सलीम तडवी, पोलीस कॉन्स्टेबल विकास पहुरकर यांचे पथक ओडिशा राज्यात रवाना केले.
अशी झाली अटक
दरम्यान, संशयित ज्या भागात वास्तव्यास होता तो भाग नक्षलग्रस्त होता. कुणालाही संशय येऊ नये म्हणून पथकातील कर्मचार्यांनी तेथे वास्तव्यास असलेल्या लोकांप्रमाणेच पेहराव केला आणि तपासाची चक्रे फिरवत संशयित काँग्रेस कुढेही याच्या मुसक्या आवळल्या. त्याला जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.