सातारा (वृत्तसंस्था) लडाखमध्ये लष्कराच्या वाहनास झालेल्या अपघातात राजाळे, ता. फलटण येथील वैभव संपतराव भोईटे या जवानास वीरमरण आले. वैभव भोईटे यांचे पार्थिव सोमवारी दुपारी राजाळे येथे आणण्यात येणार असून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शनिवार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान दक्षिण लडाखमधील नियमा जिल्ह्यातील कायरी गावाजवळ लष्करी वाहनाचा अपघात झाला. यामध्ये नऊ जवान शहीद झाले होते. कायरी गावाजवळून सात किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. हे जवान गॅरिसवरून लेहजवळच्या कायरी शहराच्या दिशेने निघाले होते. वैभव भोईटे हे २०१८ मध्ये आर्मीत भरती झाले होते. वैभव यांच्या पश्चात पोलीस पत्नी प्रणाली, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेने राजाळे गावात शोककळा पसरली आहे. या घटनेने संपूर्ण राजाळे आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
वैभव भोईटे हे ४ वर्षापूर्वीच अत्यंत कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर सैन्यात भरती झाले होते. त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पत्नी प्रणाली वैभव भोईटे या सातारा पोलीस दलात दहिवडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. त्यांना एक दीड वर्षाची लहान मुलगी आहे. एक लहान भाऊ विशाल, वडील संपत भोईटे, आई बेबीताई भोईटे, दोन चुलते विलास भोईटे (जेलर अधिकारी), मोहन भोईटे, दोन विवाहित बहिणी नीलम आणि प्रिया असा परिवार आहे.