चुंचाळे ता. चोपडा (प्रतिनिधी) येथील उद्यान पंडित अवधूत महाजन यांच्या शेतातील मोह वृक्ष पथदर्शक प्रकल्पाची पाहणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक व्ही. एम. पाटील, जवान बी. एस. परदेशी यांनी केली.
महाजन शेतीत नव नवीन प्रयोग करीत असतात. वनविभागाच्या मार्गदर्शनाने एकत्रित कुटुंबाच्या मालकीच्या ४.६६ हेक्टर बागाईत शेतात त्यांनी २००७ या वर्षी मोह रोपांची लागवड करून त्यावर वेगवेगळ्या गुण वैशिष्ट्यांची मोह प्रजातीचे कलमीकरण करून घेतले. त्यासाठी त्यांना वन व कृषी विभागाचे मार्गदर्शन लाभले. या रोपांचे आज मोठ्या वृक्षात रूपांतर होऊन उत्पादनाला सुरुवात झाली आहे. हा वृक्ष आयुर्वेदिक दृष्ट्या कल्पतरू असून इतर राज्यात यावर निर्बंध नाहीत. तरी शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरणासाठी हा वृक्ष विविध प्रक्रिया व विपणन यासाठी इतर राज्यांप्रमाणे ही महाराष्ट्रात शेतकरी उत्पन्न दुप्पट करावयाच्या धोरणाच्या विकासासाठी इतर फळबाग प्रमाणे विकसित करण्यास शासनाकडे विविध निर्बंध असलेल्या विभागातून वनशेतीतील नैसर्गिक मक्तेदारी असलेले झाडे मोह, बिब्बा, खैर, चारोळी या दिर्घायुषीवृक्ष वनऔषधी वृक्षाच्या संगोपनासाठी व शेतीत लागवडीसाठी इतर फळ झाडाप्रमाणे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे असा प्रस्ताव कृषी व वन खात्याच्या पथदर्शक प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो. असे अवधूत महाजन यांनी सांगितले.
या पथदर्शक प्रकल्प यशोगाथा (ICAR) भारतीय कृषी अनुसंधान संस्था दिल्ली या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातून सहभाग नोंदवला असून या प्रकल्पास कृषी, वनविभाग, रा.उ.शु.विभाग, कृषी विज्ञान केंद्र पालचे शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली ही बाग विकसित झाली आहे. भूमिपुत्र गटाच्या शासकीय रोपवाटिकेच्या माध्यमातून कलमीकरण वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न असून या पथदर्शक प्रकल्पाची शासनाने दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
या पथदर्शक प्रकल्प क्षेत्रभेटीसाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव यांच्यातर्फे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, चोपडा विभाग जळगाव व्ही.एम.पाटील. जवान बी.एस.परदेशी यांनी प्रकल्प माहिती संकलन केली. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांचे सुनिल बालमुकुंद महाजन यांनी आभार व्यक्त केले.