धरणगाव (प्रतिनिधी) पालिकेच्या कर्मचारी बुधवारी काही ठराविक पत्रकारांना धावडे येथील पाणीपुरवठ्याच्या पंपिंग स्टेशनला भेट देण्यास घेऊन गेले होते. त्यानंतर धरणगावकरांची दिवाळी पाण्याविनाच होणार, अशी बातमी काही दैनिकांमध्ये प्रकाशित झाली. अर्थात पत्रकार मित्रांनी प्रत्यक्ष पाहणीत जे बघितलं असेल किंवा त्यांना जे सांगण्यात आलं तेच त्यांनी आपल्या बातमीत प्रकाशित केलं असेल. मग रात्रीतून असा काय चमत्कार झाला की, अचानक धावडे येथून पाणी धरणगावला पोहचले. रात्रीतून काय चमत्कार घडला ?, दिवाळीनंतर येणारे पाणी रात्रीतून धरणगावात कसे आले?
पाणी टंचाई कृतीम नव्हे…तर पालिका प्रशासन निर्मित?
पाणी टंचाई कृतीम नव्हे…तर पालिका प्रशासन निर्मित होती का?, यात पालिकेतील कर्मचारी, अधिकारी काही राजकारण करत आहेत का?, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी टंचाईच्या बाबतीत पालिका प्रशासन धरणगावकरांच्या भावनांशी खेळतेय का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. संपूर्ण शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी १२ ते १५ दिवसांचा कालावधी लागणार असून, धरणगावकरांची दिवाळी यामुळे पाण्याविना साजरी होणार असा अंदाज धावडे येथील पाणीपुरवठ्याच्या पंपिंग स्टेशनला भेट देण्यास पत्रकार मित्रांनी आपल्या बातम्यांमधून व्यक्त केला होता.
अर्ध्या धरणगावची दिवाळी पाण्याविनाच जाणार?
बरं पालिका प्रशासन जरी उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असं सांगत असले तरी शहरात साधारण ५ झोन व १८० उपझोन आहेत. सर्व झोनला पाणीपुरवठा होण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा दिवस लागणार आहेत. त्यामुळे उद्यापासून पाणी सुरु झाले तरी अर्ध्या धरणगावची दिवाळी पाण्याविनाच जाणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे काल कोण लबाड बोलत होते ?, आणि आज कोण धरणगावकरांना उल्लू बनवतेय?, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
रात्रीतून काय चमत्कार घडला
धावडे येथील तापी नदीपात्रात पाणीपुरवठा करण्यासाठी दोन विहिरी आहेत. मात्र, त्या दोन्ही विहिरींना जोडणारा पाइप आतूनच गाळाने पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे नदीतून पाणी पंपिंग स्टेशनच्या विहिरीवर येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा करणारे १३५ एचपीचे पंप बंद आहे. पंप चालू स्थितीत असले तरी नदीतून पाणीच येत नाही. त्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती देण्यात आली. मग रात्रीतून असा काय चमत्कार घडला की, १३५ एचपीचे पंप सुरु झालेत आणि पाणी पुरवठा सुरळीतही झाला.
पालिका प्रशासन धरणगावकरांच्या भावनांशी खेळतेय का?
थोडक्यात पाणी टंचाई कृतीम नव्हे…तर पालिका प्रशासन निर्मित होती का?, असा प्रश्न अनेकांना यामुळेच पडला आहे. पालिकेतील कोणते अधिकारी आणि कर्मचारी राजकारण करू पाहताय?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अगदी कालपर्यंत दिवाळीनंतर सुरळीत होणारी पाणी पुरवठ्याची स्थिती रात्रीतून बदलली. नुसती बदलली नाही तर, उद्यापासून पाणी पुरवठा देखील करणार आहे म्हणे. जिव्हाळ्याच्या प्रश्नावर पालिका प्रशासन धरणगावकरांच्या भावनांशी खेळतेय का?, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
पालिकेचे अधिकारी, कर्मचारी राजकारण करताय का?
पाणी पुरवठा उद्यापासून सुरळीत झाल्यास धरणगावकरांना आनंदच होईल. परंतू नदीला पाणी याच वर्षी आले का?. पाईप लाईनमध्ये गाळ याच वर्षी साचला का?…तर याचं उत्तर नाही असंच आहे. मग पावसाळा लागण्यापूर्वी पालिका प्रशासने उपाय योजना का केल्या नाहीत?. पालिकेतील काही अधिकारी, कर्मचारी कार्यकाळ संपल्यानंतरही इथंच ठाण मांडून आहेत. त्यामुळे ते कुणाचं तरी राजकारण खराब करण्यास इच्छुक आहेत?, अशी जोरदार चर्चा गावात सुरु आहे. अगदी जळगावचे पत्रकार आज धरणगाव येतात आणि कधी नव्हे ते मुख्याधिकारी पण आज पालिकेत हजर राहतात?, याला निव्वळ योगायोग कसा म्हणता येईल?.