नाशिक (वृत्तसंस्था) राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना? अशी भीती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
नाशिकमध्ये ‘व्यर्थ ना हो बलिदान’ कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. “राहुल गांधी जम्मू काश्मीरमध्ये गेले आहेत. तिथे ते गेले अन् बॉम्बस्फोट झाला. ते तिथून गेले होते म्हणून बरं झालं. राहुल गांधी जिथे थांबले होते तिथून ५०० मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट झाला. नोटाबंदी झाल्यावर दहशतवाद संपेल असं यांनी सांगितलं होतं. पण मग दहशतवाद संपला का? नोटाबंदीचं सोडून द्या पण मग तुमच्याकडे इतकी मोठी यंत्रणा असताना दहशतवादी राहुल गांधी होते तिथपर्यंत कसे काय येऊ शकले,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केली.
“देशासाठी गांधी कुटुंबातील दोन व्यक्तींनी बलिदान दिलं आहे. या देशाच्या मातीत त्यांचं रक्त सांडलं. जे राहुल गांधी आज देशाच्या जनतेचा आवाज होऊन देशासाठी काम करत आहेत त्यांना संपवण्याचा हा कट तर नाही हा प्रश्न याठिकाणी निर्माण होतो,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.