मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाचे नेते पेट्रोल दरवाढीसाठी राज्य सरकारला जबाबदार धरत आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात, असे विधान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात बोलतांना केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवयच आहे, असं रोहित पवार म्हणाले.
“खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही,” अशी टीका आमदार रोहीत पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर रोहीत पवार यांनी खोटं काय आणि वस्तुस्थिती सांगणारा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
“केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रुपयांपैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला १२ रुपये मिळत असल्याचे सांगता.”, असा टोला रोहीत पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे.
रोहीत पवार म्हणाले, “विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रुपये दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही.”