जळगाव (प्रतिनिधी) : ‘आपल्या मातृभूमिला गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी संपूर्ण भारत पेटून उठला होता. प्रत्येकाच्या मनात भारतीय हीच भावना जागृत होऊन स्वातंत्र्याचा संग्राम घडला.’ या स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे व त्यांना मदत करणाऱ्या असंख्य जिल्हावासीयांचे योगदान अधोरेखित करण्यासारखे आणि प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या याच कार्याचे स्मरण करत जैन उद्योग समूहाने कंपनी आस्थापनांमधील ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी यांच्यासह ज्यांनी पारतंत्र्य अनुभवले आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांच्याहस्ते करण्याचे योजले आहे.
यामध्ये 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीसह, देवकीनंदन नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य संग्रामातील भुमिगत चळवळीत सहभागी होऊन धुळे येथे कारागृहात बंदिवान राहिलेले स्व. भगवान कंडारे यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई कंडारे यांच्याहस्ते अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी येथे ध्वजारोहण करण्यात येईल. पोर्तुगीजांविरूद्ध लढा देत गोवा मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या स्व. पंढरीनाथ मराठे यांच्या पत्नी श्रीमती रंभाबाई मराठे यांच्याहस्ते अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेंकडरी येथे ध्वजारोहण होईल. स्वातंत्र्य सैनिक स्व. अजितसिंग राजपूत यांच्या पत्नी श्रीमती सुलोचना राजपूत यांच्याहस्ते महात्मा गांधी उद्यान येथे ध्वजारोहण होईल. स्वातंत्र्य सैनिक स्व. लालसिंग पवार यांच्या पत्नी श्रीमती दगूबाई पवार यांच्याहस्ते भाऊंचे उद्यान येथे ध्वजारोहण होईल.
यासोबतच ज्यांनी पारतंत्र्य अनुभवले आहे अशा ज्येष्ठ नागरिकांमध्ये जैन ॲग्रीपार्क येथे सेवादास दलिचंदजी ओसवाल, लिलाबाई दलिचंद ओसवाल यांच्याहस्ते ध्वजारोहण होईल. जैन फूडपार्क व एनर्जी पार्क येथे श्रीमती ताराबाई शिवराज जैन यांच्याहस्ते, वाकोद येथे कविवर्य ना. धों. महानोर यांच्याहस्ते, प्लास्टिक पार्क येथे श्रीमती शंकुतलाबाई कांतीलाल जैन यांच्याहस्ते, टिश्यूकल्चर पार्क येथे श्रीमती सुलभा जोशी यांच्याहस्ते, कांताई नेत्रालय येथे डॉ. सुभाष चौधरी यांच्याहस्ते, कांताई बंधारा येथे माणकचंदजी सांड यांच्याहस्ते, कांताई सभागृह येथे प्रा. गणपतराव पोळ यांच्याहस्ते तर अनुभूती निवासी स्कूल येथे प्राचार्य देबासिस दास यांच्याहस्ते ध्वजारोहण होईल.